Israel-Hamas War : इस्रायल एकीकडे लेबनॉन आणि इराणशी संघर्ष करत आहे, तर दुसरीकडे गाझावरही त्याचे सातत्याने हल्ले सुरू आहेत. दरम्यान, आता इस्रायल डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) गुरुवारी पॅलेस्टिनी संघटना हमासच्या तीन सर्वोच्च नेत्यांचा खात्मा केल्याची माहिती दिली आहे. इस्रायलच्या हल्ल्यात गाझा सरकारचा प्रमुख रावी मुश्ताहा याचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, हमास कमांडर समेह सिराज आणि समेह औदेह हेदेखील मारले गेले आहेत.
या कारवाईची माहिती देताना IDF ने सांगितले की, इस्रायली सैन्याने गाझा पट्टीमध्ये सुमारे तीन महिन्यांपूर्वी हवाई हल्ले केले होते, ज्यात हमासचे तीन वरिष्ठ नेते रावी मुश्ताहासह समेह सिराज आणि समेह औदेह ठार झाले. तिघेही उत्तर गाझामधील भूमीगत बंकरध्ये लपले होते. या जागेचा वापर कमांड आणि कंट्रोल सेंटर म्हणून केला जायचा. तीन महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईबाबत इस्रायलने आता खुलासा केला आहे.
तीन महिन्यांपूर्वी केलेला हल्ला 3 महिन्यांपूर्वी गाझामध्ये IDF आणि ISA च्या संयुक्त हल्ल्यात गाझामधील हमास सरकारचा प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह अनेक दहशतवादी मारले गेले. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी उत्तर गाझामधील भूमिगत बंकरवर ताबडतोड हल्ले केले होते. हे बंकर हमासचे कमांड आणि कंट्रोल सेंटर होते. हमासचे सर्वोच्च नेते अनेक दिवसांपासून याच बंकरमध्ये लपून होते. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात इस्रायलने लेबनॉनमधील बेरुत येथे केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाह यालाही ठार केले आहे.
इस्रायलच्या माहितीनुसार, रावी मुश्ताहा हमासचा सर्वोच्च नेत्यांपैकी एक होता. त्याचा हमासच्या सैन्य तैनातीशी संबंधित निर्णयांवर त्याचा थेट प्रभाव होता. तो हमासचा सर्वोच्च नेता याह्या सिनवारचा उजवा हात होता. 2015 मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मुश्ताहाला 'जागतिक दहशतवादी' घोषित केले होते. गेल्या वर्षी हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता, ज्यामध्ये 1205 लोक मारले गेले होते. त्या हल्ल्याची योजना मुश्ताहाने आखली होती.