इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून गोळीबार, बॉम्बफेक आणि रॉकेट-मिसाईलचा मारा सुरू आहे. सुरुवातीला हमासच्या सैनिकांनी इस्त्रायलच्या म्युझिक फेस्टिवलमध्ये सहभागी झालेल्या लोकांवर हल्ला केला, त्यानंतर हे युद्ध सुरू झालं. या फेस्टमध्ये सुमारे 260 लोकांचा मृत्यू झाला होता. 27 वर्षीय मॉडेल नोआम मजल बेनने या सर्व भीषण परिस्थितीत आपला जीव कसा वाचवला हे सांगितलं आहे.
नोआमने सांगितलं की, 7 ऑक्टोबर रोजी ती तिच्या प्रियकर डेविड नेमानसोबत एका म्युझिक फेस्टचा आनंद घेत होती तेव्हा अचानक हमासचा दहशतवादी हल्ला झाला. तिने संडे एक्स्प्रेसला सांगितलं की, "गोळीबार आणि गोंधळ सुरू होताच मी डेविडला सांगितलं की, इथे एक कंटेनर आहे, चला त्यात लपून बसू. आम्ही लपलो. त्यानंतर दहशतवाद्यांनी थोड्याच अंतरावर ग्रेनेड फेकलं. आम्हाला समजलं होतं की तिथले सर्वजण मारले गेले आहेत. मग त्यांनी आम्हाला घेरलं."
"गोळ्या घालणं सतत सुरू होतं. डेविडच्या छातीत गोळी लागली, माझ्या पायाला आणि कमरेला मार लागला आणि मी पडले. मी डेविडला माझ्या डोळ्यासमोर मरताना पाहिलं. मी त्याच्या आणि इतर लोकांच्या शरीराखाली एखाद्या प्रेतासारखी शांतपणे पडून होती. सर्वांना मृत झालेलं समजून दहशतवादी एका मुलीला घेऊन पुढे गेले. कृपया मला सोडा, मला घेऊन जाऊ नका' अशी ती मुलगी ओरडत असल्याचं मला आठवतं पण त्यांनी तिचं अपहरण केलं."
"डेविडच्या मृतदेहाखाली दोन तास पडून राहिल्यानंतर अखेर इस्रायली सैन्याने मला शोधून काढलं आणि माझी सुखरूप सुटका केली. यानंतर लेनियाडो रुग्णालयात नेण्यात आले. देवाचे आभार मानते की मी इथे आले. इथे मला चांगले उपचार मिळाले, हे चांगले लोक आहेत" असं देखील नोआमने सांगितलं. युद्धातील अंगावर काटा आणणाऱ्या अनेक घटना या समोर आल्या आहेत.