इस्रायली हवाई दलाने गाझा पट्टीतील हमासच्या अनेक ठिकाणांवर बॉम्बफेक सुरूच ठेवली आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझामध्ये आतापर्यंत 1537 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 6612 जण जखमी झाले आहेत. इस्रायलने गाझा पट्टीवर आतापर्यंत 6000 हून अधिक बॉम्ब टाकले आहेत. इस्रायलचा दावा आहे की, त्यांनी हमासची 3600 हून अधिक ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत.
हमासने शनिवारी गाझा पट्टीतून इस्रायलवर हजारो रॉकेट डागले होते. एवढेच नाही तर हमासने हवाई, सागरी मार्ग आणि सीमेद्वारे इस्रायलच्या हद्दीत घुसून नागरिकांवर हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये इस्रायलमध्ये 1200 लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासने शेकडो लोकांना ओलीसही ठेवले आहे. तेव्हापासून इस्रायल गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर हवाई हल्ले करत आहे.
यूएनच्या म्हणण्यानुसार, 23 लाख लोकसंख्या असलेल्या गाझामध्ये हवाई हल्ल्यांमुळे लोकांना घरं सोडावी लागली आहेत. आतापर्यंत 423,000 लोक विस्थापित झाले आहेत. यातील बहुतांश लोक यूएनद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांचा आधार घेत आहेत.
इस्रायली सैन्याने गाझा पट्टीजवळ आपले टँक तैनात केले आहेत. अशा परिस्थितीत शुक्रवारी लष्कराने गाझा पट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना जागा रिकामी करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. इस्त्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलेंट यांनी गुरुवारी सांगितले की, आता युद्धाची वेळ आली आहे. इस्रायली सैन्याने सांगितले की, ते येत्या काही दिवसांत गाझा शहरात कारवाई करेल आणि पुढील आदेशानंतरच नागरिक परत येऊ शकतील. "गाझा शहरातील नागरिकांनो, तुमच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि तुमच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी, दक्षिणेकडे जा आणि तुमची मानवी ढाल म्हणून वापर करणाऱ्या हमासच्या दहशतवाद्यांपासून स्वतःला दूर ठेवा" असे लष्कराने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.