इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचलं आहे. हमास आणि इस्रायलमधील युद्ध 11 व्या दिवशीही सुरू आहे. गाझा पट्टीतून कार्यरत असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेने 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलवर प्राणघातक हल्ला केला होता, त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत 4200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
एपी वृत्तसंस्थेनुसार, मंगळवारी (17 ऑक्टोबर) रात्री 10:30 वाजता हमासने दावा केला की, इस्रायलने गाझा पट्टीतील अल अहली हॉस्पिटलवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात 500 लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, इस्रायलमधील तेल अवीव आणि अश्कलोन या शहरांमध्ये सायरनचे आवाज ऐकू आले. दरम्यान, ब्रिटनमधील पॅलेस्टिनी मिशनचे प्रमुख हुसाम जोमलॉट यांनी म्हटले आहे की, गाझामध्ये मृतांची वास्तविक संख्या जास्त आहे. कारण बचाव पथक अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचू शकलेले नाही. तसेच, या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे मध्यपूर्वेत संघर्ष वाढण्याची भीती हुसाम जोमलॉट यांनी व्यक्त केली आहे.
इस्रायली सैन्य गाझामध्ये जमिनीवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. याआधी इस्रायली लष्कराने उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या लोकांना स्थलांतर करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विस्थापन दिसून आले. याचबरोबर, हमाससोबतच्या युद्धात अमेरिका पूर्णपणे इस्रायलच्या पाठीशी उभी आहे. अमेरिकन सरकारच्या आदेशानुसार सुमारे 2000 अमेरिकन सैनिक आणि युनिट्सना अलर्ट करण्यात आले आहे. अमेरिकेने अनेक प्रसंगी सांगितले आहे की, जोपर्यंत ते अस्तित्वात आहे तोपर्यंत ते इस्रायलची साथ सोडणार नाही. या आश्वासनादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन बुधवारी इस्रायलला पोहोचत आहेत.
हमासचा वरिष्ठ कमांडर ठारइस्त्रायल सध्या दोन आघाड्यांवर युद्ध लढत आहे. एकीकडे ते गाझा पट्टीतून हमासच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे. दुसरीकडे, हिजबुल्लाहचे दहशतवादी लेबनॉनमधून हल्ले करत आहेत, त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल हवाई हल्ले करत आहे. आता इस्रायली लष्कराने हमास कमांडर मारला गेल्याचे म्हटले आहे. इस्रायली सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात अयमान नोफल (Ayman Nofal) ठार झाला आहे. तो हमासचा वरिष्ठ कमांडर असल्याचे सांगितले जाते. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, अयमान हा हमासच्या जनरल मिलिटरी कौन्सिलचा सदस्य होता. याशिवाय, इस्रायली लष्कराने दहशतवादी संघटना हिजबुल्लाहच्या दोन दहशतवाद्यांनाही ठार केले आहे.