तेल अवीव : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा आजचा २३ वा दिवस आहे. एकीकडे इस्रायली सैन्य हमासवर हल्ले करत आहे. दुसरीकडे, इस्रायली सैन्य लेबनान दहशतवादी संघटना हिजबुल्लाहवरही वेगाने हवाई हल्ले करत आहेत. २.३ मिलियन लोकसंख्या असलेल्या गाझा पट्टीमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, ३,३२४ अल्पवयीन मुलांसह ८,००५ लोकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, इस्रायली सैन्य गाझा पट्टीच्या उत्तर भागात पोहोचले असून, तेथे हमासचे सैनिक लपून बसले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सोमवारी पहाटे पॅलेस्टिनींना उत्तर गाझामधील दोन प्रमुख रुग्णालयांच्या आसपास इस्रायली हवाई आणि जमिनीवरील हल्ल्यांचा सामना करावा लागला. इस्रायलचे सैन्य गाझा पट्टीच्या भागात रणगाड्यांसह जमिनीवर उतरले आहे. त्याचबरोबर पॅलेस्टाईनमधील सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
पॅलेस्टिनी माध्यमांनी सांगितले की, इस्रायली हवाई हल्ल्यांनी गाझा शहरातील शिफा आणि अल-कुद्स रुग्णालयांजवळील भागांना लक्ष्य केले आणि एन्क्लेव्हच्या दक्षिणेकडील खान युनिस शहराच्या पूर्वेकडील सीमावर्ती भागात पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी इस्त्रायली सैन्याशी संघर्ष केला. सोमवारच्या लढाईवर हमास किंवा इस्रायली सैन्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
इस्रायलने पॅलेस्टिनी एन्क्लेव्हच्या वेस्ट बँकमधील युद्ध टँकचे फोटो जारी केल्यानंतर काही तासांनी हा बॉम्बस्फोट झाला. ऑनलाइन पोस्ट केलेल्या काही फोटोंमध्ये इस्रायली सैनिक गाझामध्ये इस्रायली ध्वज फडकवताना दिसत आहेत. तसेच, फोन आणि इंटरनेटची समस्या रविवारी काहीशी पूर्ववत असल्याचे दिसून आले, परंतु टेलिकम्युनिकेशन प्रदाता पॅलटेलने म्हटले आहे की, इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे एन्क्लेव्हच्या उत्तरेकडील भागांमध्ये पुन्हा इंटरनेट आणि फोन सेवा विस्कळीत झाली आहे, जिथे हमास कमांड सेंटर आहे.