Israel Hamas War: गाझापट्टीत इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या ३९ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धबंदीचे आंतरराष्ट्रीय समुदायाचे आवाहन पुन्हा धुडकावले असून, ओलिसांची सुटका होईपर्यंत लढाई सुरूच ठेवण्याचा पुनरुच्चार केला आहे. यातच इस्रायल सैन्याने हमासच्या संसदेवर ताबा मिळवला असून, त्याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. यानंतर आता हमासने गाझापट्टीवरील नियंत्रण गमावले आहे, असा दावा इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी केला आहे.
हमासचा गाझावर १६ वर्षांपासून ताबा होता. पण, हमासने आता गाझापट्टीवरील नियंत्रण गमावले आहे. हमासचे दहशतवादी पळ काढत आहेत. हमासचे तळ नागरिकांनी उद्ध्वस्त केले आहेत. नागरिक हमासच्या तळांना लक्ष्य करून लूटमार करत आहेत. गाझातील नागरिकांचा सरकारवर विश्वास नाही, असा दावा संरक्षणमंत्र्यांनी केला आहे.
हमासकडे इस्रायल सैन्याला रोखू शकणारी शक्ती नाही
इस्रायलचे सैनिक नियोजित योजनेनुसार काम करत आहेत. गुप्तचर माहितीचा वापर करून ते हमासचा अचूकपणे खात्मा केला जात आहे. हवाई, सागरी आणि भूदल सैन्य समन्वयाने मोहिमा राबवत आहेत, असे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच हमासकडे इस्रायल सैन्याला रोखू शकणारी शक्ती नाही. इस्रायलचे सैन्य प्रत्येक टप्प्यावर प्रगती करत आहे. हमासने गाझावरील नियंत्रण गमावले आहे. हमासचे दहशतवादी दक्षिणेकडे पळून जात आहेत, असेही संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धात सहभागी झालेल्या लष्कराच्या जवानांची भेट घेऊन प्रोत्साहन दिले. हे केवळ एक ऑपरेशन नाही, तर निर्णायक युद्ध आहे. हा दिखाऊपणा नसून, मनापासून केलेले काम आहे. आम्ही त्यांना संपवले नाही तर ते परत येतील, असे पंतप्रधान नेतन्याहू यांनी सांगितले. आतापर्यंत गाझापट्टीमध्ये इस्रायल लष्कराने केलेल्या हल्ल्यात ११ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.