Israel-Hamas: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाने रौद्र रुप धारण केले आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलनेही गाझामध्ये भीषण हल्ले सुरू केले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझामध्ये राहणारे लोक जीव वाचवण्यासाठी धावत आहेत. उत्तर गाझामधून 1.1 मिलियन लोक विस्थापित झाले आहेत. युनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्राम (UNWFP) ने सांगितले की, गाझा पट्ट्यातील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, केवळ चार ते पाच दिवसांचे रेशन शिल्लक आहे.
अन्न आणि पाण्याची कमतरताइस्रायली लष्कर हमासवर जमीन, समुद्र आणि हवेतून सातत्याने बॉम्बफेक करत आहे. उत्तर गाझातून पळून जाऊन दक्षिण गाझामधील खान युनिस येथे पोहोचणाऱ्या पॅलेस्टिनींना सध्या भेडसावणारे सर्वात मोठे संकट म्हणजे अन्न-पाणी. दक्षिण गाझामध्ये पाण्याची एकच पाइपलाइन असून ही पाइपलाइन दिवसातून केवळ तीन तास सुरू असते, त्यामुळे खान युनिसच्या सुमारे एक लाख लोकसंख्येपैकी निम्म्या लोकांनाच मर्यादित पाणी मिळत आहे.
संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे की, पॅलेस्टिनींसाठी पाणी हे सर्वात मोठे आव्हान आहे, कारण पाण्याशिवाय गंभीर परिस्थिती निर्माण होईल. अशा परिस्थितीत डिहायड्रेशन आणि इतर आजारांमुळे परिस्थिती आणखी बिकट होईल. अन्नाचाही पुरवठा नगण्य आहे. लोकांना भाकरीसाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे.
जखमींना औषध नाहीग्लोबल फूड प्रोग्राम मध्य पूर्व प्रवक्ते अबीर इतेफा यांनी सांगितले की, गाझामध्ये डब्ल्यूपीपीच्या 23 बेकरी आहेत, त्यापैकी फक्त पाच सुरू आहेत. मात्र गाझामधील पुरवठा संपण्याच्या मार्गावर आहे. यापैकी सहा लाख लोक खान युनिस आणि रफाह येथे पोहोचले आहेत तर सुमारे चार लाख लोक संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये आहेत. गाझामधील परिस्थिती इतकी भीषण आहे की, जखमींसाठी औषधेही उपलब्ध नाहीत. इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात गाझामध्ये आतापर्यंत 2800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 11,000 लोक जखमी झाले आहेत.
युद्ध कसे सुरू झाले?इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा मंगळवारी 11 वा दिवस आहे. 7 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टिनी दहशतवादी समूह हमासने गाझा पट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ल्यांची मालिका सुरू केली. हमासने 20 मिनिटांत गाझा पट्टीतून 5,000 रॉकेट डागले. एवढंच नाही तर इस्रायलमध्ये घुसखोरी करून काही लष्करी वाहने ताब्यात घेतली आणि अनेक महिलांवर अत्याचार करुन अपहरणही केले. यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा करत सातत्याने गाझावर हल्ले सुरू केले.