Al-Ahli Arab Hospital Attack: इस्रायल-हमास यांच्यातील युद्धादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (19 ऑक्टोबर) पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी गाझा येथील अल-अहली हॉस्पिटलमध्ये झालेल्या स्फोटात प्राण गमावलेल्या लोकांप्रती दुःख व्यक्त केले.
पीएम मोदी म्हणाले, "पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी चर्चा केली. यावेळी मी गाझातील अल अहली रुग्णालय हल्ल्यातील मृतांबाबत शोक व्यक्त केला. आम्ही पॅलेस्टाईनच्या लोकांना मानवतावादी मदत पाठवत राहू. दहशतवाद, हिंसाचार आणि प्रदेशातील ढासळत चाललेली सुरक्षा परिस्थिती यावर तीव्र चिंता व्यक्त केली. इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भारताच्या दीर्घकालीन भूमिकेचा आम्ही पुनरुच्चार केला."
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध 7 ऑक्टोबर रोजी सुरू झाले. हमासने सर्वात आधी इस्रायलमध्ये घुसखोरी करून हल्ला केला. यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा केली. सलग 13 व्या दिवशीही युद्ध सुरू आहे. मंगळवारी (17 ऑक्टोबर) गाझातील अल-अहली रुग्णालयात झालेल्या स्फोटात 500 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. इस्रायलने हवाई हल्ला केल्याचा हमासचा दावा आहे. तर इस्रायलचे म्हणणे आहे की, हा हल्ला हमासनेच केला आहे.