गाझा पट्टीत हमास आणि इस्रायलमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतांचा आकडा 26 हजारांच्या पुढे गेला असून मृतांमध्ये सुमारे दहा हजार मुलांचा समावेश आहे. परिसर कब्रस्तान बनला आहे. असं असूनही तेथे इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत. गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील खान युनिस भागात इस्रायली सैन्याचे हल्ले सुरू आहेत. परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
इस्रायली सैन्याने वेस्ट बँकमधील हॉस्पिटलवर छापा टाकला. तपासादरम्यान तीन पॅलेस्टिनींना गोळ्या घालून ठार केलं. नागरिक आणि डॉक्टरांच्या वेशात आलेल्या इस्रायली लष्कराच्या सैनिकांनी जेनिन येथील रुग्णालयात तीन पॅलेस्टिनींची हत्या केली. पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी या हल्ल्याचा निषेध करत ही हत्या असल्याचं म्हटलं आहे. तिथे राहणाऱ्या लोकांनी इस्रायली लष्कराच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायली तुरुंगात कैद असलेल्या पॅलेस्टिनींची मोठ्या प्रमाणावर सुटका करणं किंवा गाझावरील इस्रायली हल्ले थांबवणं या कराराला आपण सहमती देणार नसल्याचं म्हटलं आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये असं आढळून आले आहे की, इस्रायलने पहिल्यांदा पॅलेस्टिनी भूभागावर हल्ला केला तेव्हापासून गाझामधील निम्म्याहून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत किंवा नुकसान झालं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, भूक लागलेली असलेल्या लोकांच्या जमावाने अन्न हिसकावून घेतल्याने नासिर रुग्णालयात अन्न पोहोचवण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले की, ही घटना गाझामधील भीषण परिस्थिती आणि उपासमारी दर्शवते.
युद्धादरम्यान मिळालेल्या वृत्तानुसार, अलीकडच्या काही दिवसांत दक्षिणेकडील शहरात लढाई तीव्र झाली आहे. विशेषत: हजारो लोक आश्रय घेत असलेल्या रुग्णालयाच्या संकुलाच्या आसपास ही परिस्थिती आहे. इस्रायलने यापूर्वी सातत्याने दावा केला आहे की हमास कारवायांसाठी सुरुंग, रुग्णालये आणि इतर पायाभूत सुविधांचा वापर करत आहे. इस्रायली सैन्याने आतापर्यंत हमास 10,000 लोकांना मारल्याचा दावा केला आहे. तर 10,000 जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.