Israel-Hamas War : गेल्या अनेक महिन्यांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक देश युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, जे काम जगातील अनेक बलाढ्य देश करू शकले नाहीत, ते काम गाझामध्ये राहणाऱ्या एका 10 महिन्यांच्या मुलाने केले आहे. 11 महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध 3 दिवसांसाठी थांबवण्यात आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, हमास आणि इस्रायलने वेगवेगळ्या झोनमध्ये 3 दिवसांसाठी युद्धविराम करण्यास सहमती दर्शविली आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसह अनेक महासत्ता प्रयत्न करत होते, पण एका 10 महिन्यांच्या बाळाने हा चमत्कार केला आहे. युद्ध थांबवण्याचे कारण म्हणजे, डब्ल्यूएचओला गाझामध्ये 25 वर्षांनंतर पोलिओचा विषाणू आढळला आहे. 10 महिन्यांच्या अब्दुल रहमान टाइप 2 पोलिओ विषाणूची लागण झाल्याने अपंग झाला आहे. ही माहिती समजताच डब्ल्यूएचओने गाझामध्ये पोलिओची लस देण्याची मोहिम हाती घेतली आहे. या भागातील 6.4 लाख मुलांना तत्काळ पोलिओ लसीकरणाची आवश्यकता असल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणने आहे.
3 झोनमध्ये 3 दिवसांसाठी युद्धबंदीडब्ल्यूएचओचे अधिकारी रिक पेपरकॉर्न यांनी सांगितले की, युद्धामुळे या भागात पोलिओ लसीकरणाची मोहिम राबवणे अवघड झाल्यामुळे त्यांनी युद्धविरामची विनंती केली होती. त्यामुळेच आता इस्रायली लष्कर आणि हमासमध्ये 3 वेगवेगळ्या झोनमध्ये 3 दिवसांसाठी युद्धविरामावर सहमती झाली आहे. या 3 दिवसांच्या युद्धविराम काळात 6 लाख 40 हजार मुलांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. रविवारपासून सुरू होणारी लसीकरण मोहिम सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालेल. लसीकरण मोहीम मध्य गाझा येथून सुरू होईल, त्यानंतर दक्षिण गाझा आणि नंतर उत्तर गाझा येथे राबविण्यात येईल. आवश्यक असल्यास चौथ्या दिवशीही प्रत्येक झोनसाठी युद्धविराम करण्याबाबत इस्रायल आणि हमास यांच्यात करार झाला आहे.
11 महिन्यांपासून युद्ध सुरू 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला, या हल्ल्यात 1,200 लोक मारले गेले आणि 250 इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवल्याचा हमासचा दावा आहे. यानंतर इस्रायलने हमासवर मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरू केली. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या हल्ल्यात सुमारे 40 हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे, तर दुप्पट लोक जखमी झाले आहेत. गाझा पट्टीत इस्रायली सैन्याच्या सुरू असलेल्या कारवाईमुळे गाझामधील जवळजवळ संपूर्ण लोकसंख्या (23 लाख लोक) विस्थापित झाली आहे.