इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान आता इस्रायली सैन्याने एयरस्ट्राइक केल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये 32 जणांचा मृत्यू झाला आहे. एपीच्या रिपोर्टनुसार, इस्रायली लष्कराने गाझा पट्टीच्या खान युनिसमध्ये रात्री एयरस्ट्राइक केला. यामध्ये एका चार मजली निवासी इमारतीला लक्ष्य करण्यात आले. एयरस्ट्राइकनंतर वाचलेल्यांनी सांगितले की, या हल्ल्यात 32 जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना खान युनूस येथील नासेर रुग्णालयात नेण्यात आले आहे.
अल जझीराच्या वृत्तानुसार, गाझा शहरातील अल-वफा हॉस्पिटलच्या आसपासच्या भागात एयरस्ट्राइक केला जात आहे. हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर फवाद नाझिम यांनी सांगितले की, हॉस्पिटलमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग आणि त्याच्या आजूबाजूच्या भागांना एयरस्ट्राइकद्वारे लक्ष्य केले जात आहे. त्यांनी सांगितले की, एयरस्ट्राइकपूर्वी कोणताही इशारा देण्यात आला नव्हता. बहुतांश रुग्ण कोमात असल्याने आम्ही रुग्णालय सोडू शकत नाही असंही म्हटलं आहे.
इस्रायल संरक्षण दलाने दावा केला आहे की, हमास गाझामधील रुग्णालये आणि नागरिकांना पुरवण्यासाठी जनरेटरसाठी आवश्यक इंधन साठवत आहे. सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये, इस्रायली लष्कराने इजिप्तच्या सीमेवर तैनात हमासने चालवलेल्या 12 इंधन टाक्यांचे सॅटेलाईट फोटो प्रसिद्ध केले आहेत. इस्त्रायली लष्कराने अशा वेळी ही फोटो प्रसिद्ध केली आहेत, जेव्हा गाझामधील रुग्णालयांमध्ये इंधन संपल्याने वीज तुटवडा निर्माण झाल्याची चर्चा आहे.
हमासने 50 ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात केली 'ही' मागणी
इस्रायल आणि हमास यांच्यात 18 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. हमासने आता दुहेरी नागरिकत्व असलेल्या 50 ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायलकडून इंधन पुरवठ्याची मागणी केली आहे. मात्र, इस्रायलने ही मागणी फेटाळून लावली आहे. सर्व 220 ओलिसांची सुटका केल्यावरच ते इंधन पुरवठा करण्यास परवानगी देईल, असं इस्रायलचं म्हणणं आहे. हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 1400 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय हमासने शेकडो इस्रायली आणि परदेशी नागरिकांना ओलीस ठेवले होते.