Israel Hamas War, Ceasefire Talks: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. त्यानंतर आता इस्रायलचे सैन्य राफावर हल्ल्याची तयारी करत असल्याच्या बातम्या येत आहेत. पण या तयारीच्या मध्येच आता एक वेगळीच बातमी समोर येत आहे. गाझापट्टीत सुरु असलेले इस्रायल-हमास युद्ध लवकरच थांबणार असल्याचा आशेचा किरण दिसू लागला आहे. इस्रायलला दिलेला युद्धबंदीचा प्रस्ताव विस्ताराने विषद करण्यासाठी हमासचे शिष्टमंडळ आज इजिप्तला जाणार आहे. दुसरीकडे व्हाईट हाऊस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की राफावर कोणत्याही प्रकारचा हल्ला करण्याआधी इस्रायलचे सैन्य अमेरिकेशी चर्चा करण्यात असल्यावर सहमत आहे. कतार, इजिप्त आणि अमेरिका यांच्या मध्यस्थीने सुरू असलेली ही चर्चा युद्धविरामाची शेवटची शक्यता मानली जात आहे. याआधीही इस्रायल आणि हमास यांच्यात 6-7 वेळा युद्धविरामासाठी बैठका झाल्या आहेत. मात्र सर्व बैठका अनिर्णित राहिल्या. पण आज या बैठकीत काही महत्त्वाचा निर्णय झाला तर मोठी घोषणा केली जाऊ शकते असे जाणकारांचे मत आहे.
सध्या या प्रस्तावावर हमासच्या प्रतिक्रियेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर, इजिप्तच्या सीमेला लागून असलेल्या राफा या शहरात दहा लाखांहून अधिक पॅलेस्टाइन नागरिक पळून गेले आहेत. कारण इस्रायली लष्कर सातत्याने बॉम्बहल्ले करून उत्तर आणि मध्य गाझामध्ये बराचसा भाग लक्ष्य करत होते. इस्त्रायली लष्कर आता राफामध्येही हल्ला करण्याची योजना आखत आहे, त्यामुळे जागतिक पातळीवर चिंता निर्माण झाली आहे.
इस्रायलचे म्हणणे आहे की, आम्ही हमासला गाझाच्या दिशेकडील भागातून हुसकावून लावले आहे आणि त्यांचे दहशतवादी आता राफामध्ये आहेत. इस्रायली लष्कराचे माजी अधिकारी मेजर जनरल इस्रायल झिव्ह यांनी २६ एप्रिल रोजी सांगितले की, हमासची कासम ब्रिगेड राफामध्ये इस्रायली सैन्याविरूद्ध घातपाताची तयारी करत आहे. तसेच हा हल्ला इस्रायली लष्करासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो.
अशा परिस्थितीत युद्धबंदीच्या प्रस्तावावर सकारात्मक गोष्टी घडल्या तर इस्रायल-हमास युद्ध थांबू शकते असे आंतरराष्ट्रीय जाणकारांचे मत आहे.