PM Benjamin Netanyahu, Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. इस्रायलचे अनेक नागरिक हमासने ओलीस ठेवले आहेत. तशातच आता हमास सोबतच हिज्बुल्लाच्या ( Hezbollah ) दहशतवादी गटाकडूनही इस्रायलवर हल्ले केले जातात. नुकतेच पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या खाजगी निवासस्थानाला हिज्बुल्लाने लेबनानमधून ( Lebanon ) लक्ष्य केले. दक्षिण इस्रायलमध्येही हमासने हल्ला केला, त्यात अनेक इस्रायली नागरिकांचा बळी गेला. यावरून नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या होत्या. त्यातच आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या अडचणीत वाढ होत आहे. युद्धाच्या एक वर्षानंतरही ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांना परत आणण्यास नेतन्याहू सरकार अपयशी ठरले आहे. हा मुद्दा त्यांचे सत्तेतून बाहेर पडण्याचे सर्वात मोठे कारण बनू शकते. त्यामुळे आता नेतन्याहू सरकारला हमासच्या काही अटी-शर्तींवर विचार करण्याची वेळ आली आहे.
सरकार वाचवण्यासाठी नमते घेणार?
इस्रायलच्या रस्त्यावर ओलीस ठेवलेल्या नागरिकांच्या परतीच्या करारासाठी रोज निदर्शने होत आहेत. दुसरीकडे हिज्बुल्ला लेबनानच्या भूमीवरून इस्रायलमधील विविध शहरांवर हल्ले करत आहे. दोन्ही बाजू संपूर्ण युद्धविरामासाठी तयार नाहीत आणि त्यांनी आतापर्यंत हमासने प्रस्तावांमध्ये अशा अटी घातल्या आहेत, ज्यामुळे मध्यस्थांना शांतता प्रस्तावाची अंमलबजावणी करणे अधिक कठीण झाले आहे. नेतन्याहू लष्करी कारवाईद्वारे ओलिसांची सुटका करण्यासाठी सैन्यावर दबाव आणत आहेत, तर माजी संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी म्हटले आहे की, आता लष्कराने गाझामध्ये आपली कारवाई पूर्ण केली आहे, पण केवळ राजकीय मध्यस्थांच्या माध्यमातून ओलिसांची सुटका केली जाऊ शकते.
नेतन्याहू यांनी तातडीची बैठक
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी संध्याकाळी गाझामधील ओलिसांच्या सुटकेवर महत्त्वाचे मंत्री आणि उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांसह तातडीची बैठक बोलावली. एका वृत्तानुसार, या बैठकीत ओलिसांची सुटका करण्यासाठी हमाससोबत युद्धविराम हाच एकमेव मार्ग असल्याचा सूर उमटला. सुरक्षा एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सरकारी मंत्र्यांना सांगितले की हमास अजूनही युद्ध संपवण्याची आणि गाझा पट्टीतून सैन्य मागे घेण्याची मागणी करत आहे. अहवालात म्हटले आहे की सुरक्षा प्रमुखांनी नेत्याच्या मृत्यूनंतरही हमासची भूमिका बदललेली नाही यावर जोर दिला आणि अशा मागण्या मान्य करणे हाच करारावर पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे.
युद्धविरामासाठी हमासची अट
कोणताही तात्पुरती युद्धविराम सध्या स्वीकारला जाणार नाही, असे हमास सुरुवातीपासून सांगत आहे. हमासचे म्हणणे आहे की इस्रायलने गाझामधून आपले सैन्य मागे घ्यावे, गाझाच्या पुनर्बांधणीसाठी निर्बंध उठवावे आणि मदत करावी, तसेच संपूर्ण युद्धविराम व्हावा, अशीही अट हमासने ठेवली आहे.