इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धानंतर गाझा पट्टीतील संचार आणि इंटरनेट सुविधा पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता एलॉन मस्क यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. मोठी घोषणा करताना एलॉन मस्क म्हणाले की, ते गाझा पट्टीमध्ये मानवतावादी मदतीसाठी त्यांची स्टारलिंक इंटरनेट सुविधा प्रदान करतील. मस्क यांच्या या पाऊलानंतर इस्रायल खवळला आहे. याविरोधात लढण्यासाठी इस्रायल सर्व मार्ग वापरेल अशी धमकी दिली आहे.
इस्रायलचे मंत्री श्लोमो करही यांनी सोशल मीडिया माध्यम 'एक्स'वर सांगितलं की, एलॉन मस्क यांनी पुरवलेलं इंटरनेट हमास दहशतवादी कारवायांसाठी वापरणार आहे. श्लोमो करही पुढे म्हणाले की, कदाचित मस्क आमची किडनॅप झालेली मुलं, वृद्ध लोक आणि मुलींच्या सुटकेच्या अटीच्या बदल्यात इंटरनेट देण्यास तयार असतील. जोपर्यंत हा निर्णय मागे घेणार नाही, तोपर्यंत माझ्या कार्यालयाचा स्टारलिंकशी संबंध राहणार नाही असंही म्हटलं
अलेक्झांड्रिया ओकासिओ-कोर्टेझने X वर एक पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की 2.2 मिलियन लोकसंख्येसाठी संचार बंद करणं अस्वीकार्य आहे. सर्वच लोक धोक्यात आहेत. मला माहीत नाही की अशा कृत्याचा बचाव कसा केला जाऊ शकतो. अमेरिकेने या प्रथेचा ऐतिहासिक निषेध केला आहे. याला उत्तर देताना एलॉन मस्क यांनी स्टारलिंक गाझामधील आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त मदत संस्थांना कनेक्टिव्हिटीचे समर्थन करेल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.