जवळपास आठ महिने उलटत आले तरी इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेला संघर्ष थांबवण्याचं नाव घेत नाही आहे. दरम्यान, दक्षिण गाझामधील राफा शहरामध्ये इस्राइलच्या लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर जगभरातून इस्राइलमधील बेंजामिन नेतन्याहू सरकारवर टीका होत आहे. तसेच सध्या सोशल मीडियावर ‘ALL Eyes on Rafah’ ही पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. तसेच अनेक नामांकित व्यक्तीही ही पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करत आहेत. याला इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच ७ ऑक्टोबर रोजी तुमचे डोळे कुठे होते? असा प्रतिप्रश्न इस्राइलकडून विचारण्यात येत आहे.
सोशल मीडियावर इस्राइलविरोधात सुरू असलेल्या ट्रेंडला प्रत्युत्तर देताना बेंजामिन नेतन्याहू यंनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणाले की, तुमचे डोळे ७ ऑक्टोबर रोजी कुठे गेले होते? नेतन्याहू यांनी एक फोटो शेअर केला असून, त्यामध्ये हमासचा एक दहशतवादी दिसत असून, त्याच्यासमोर एक चिमुकला बसला आहे. तसेच बॅकग्राऊंडमध्ये सगळीकडे रक्त आणि हल्ल्यात नुकसानग्रस्त झालेल्या इमारती दिसत आहेत.
या पोस्टमधून बेंजामिन नेतन्याहू यांनी गतवर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्राइलमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या त्या क्रूर हल्ल्यात ११६० इस्राइल नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो लोकांना हे दहशतवादी बंधक बनवून घेऊन गेले होते. मात्र शांती करारानुसार सोडण्यात आले होते. मात्र अजूनही सुमारे १०० इस्राइली नागरिक हमासच्या ताब्यात असल्याचा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, हमासच्या या हल्ल्यानंतर इस्राइलने गाझापट्टीमध्ये तुफानी प्रतिहल्ला केला होता. तसेच तेव्हापासून हा संघर्ष सुरू आहे. तसेच इस्राइलच्या कारवाईमध्ये ३० हजारांहून अधिक पॅलेस्टाइनी नागरिकांचा मृत्यू झाला. इस्राइलने उत्तर गाझामधील लोकांना हा भाग खाली करून दक्षिण गाझामध्ये जाण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर लाखो लोकांनी राफा शहरात आश्रय घेतला होता. मात्र येथील एका रिलिफ कॅम्पवर इस्राइलने केलेल्या बॉम्बहल्ल्यात ४५ लोकांना मृत्यू झाला आहे. तेव्हापासून ALL Eyes on Rafah ट्रेंड होत आहे.