इस्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती आहे. द टाइम्स ऑफ इस्रायलच्या रिपोर्टनुसार, इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलेंट यांनी म्हटलं आहे की, इस्रायलने आपले लक्ष्य साध्य केल्यानंतर गाझामधील हमासविरुद्धचे युद्ध संपुष्टात येईल, उत्तर गाझा पट्टीतील हमासच्या जबलिया आणि शेजॅया बटालियन विनाशाच्या मार्गावर असल्याचं त्यांनी सांगितलं.
एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना गॅलेंट म्हणाले की, "युद्धाची उद्दिष्टे साध्य झाल्यावरच युद्ध संपेल. अमेरिकेने जे काही विचारलं आणि सांगितलं ते मी लक्षात ठेवलं आहे आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांसमवेत अमेरिका काय करत आहे ही बाब मी गांभीर्याने घेतो. आम्ही अमेरिकन लोकांना आमची मदत करण्यासाठी एक मार्ग शोधू."
द टाइम्स ऑफ इस्रायलच्या रिपोर्टनुसार, हमाससह संभाव्य नवीन ओलीस लोकांबाबत असलेल्या डिल्सबाबत विचारलं असता गॅलेंट म्हणाले की, इस्रायलने लष्करी दबाव वाढविल्यास ओलिसांच्या सौद्यांसाठी आणखी ऑफर मिळतील. ते म्हणाले, "माझा विश्वास आहे की जर आपण लष्करी दबाव वाढवला तर आणखी ओलीस सौद्यांचे प्रस्ताव येतील आणि जर प्रस्ताव आले तर आम्ही त्यावर विचार करू."
अलीकडच्या काही दिवसांत शेकडो हमासच्या सैनिकांनी इस्रायली सैन्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. आम्ही जबलिया आणि शेजॅया येथील हमासच्या शेवटच्या ठिकाणांना घेरलं आहे, ज्या बटालियन्स अजिंक्य समजल्या जात होत्या, ज्या वर्षानुवर्षे आमच्याशी लढण्यासाठी सज्ज होत्या, त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत असंही म्हटलं आहे.