जेरुसलेम : इस्रायल व पॅलेस्टिन यांनी आपसातील संघर्ष व हिंसाचार टाळावा यासाठी संयुक्त राष्ट्राने केलेले आवाहन धुडकावून देत इस्रायलने आपले आक्रमण चालूच ठेवले असून, पलेस्टिनची हमास संघटनाही रॉकेटचा मारा करतच आहे. गाझा पट्टीवरील नागरिकांत मात्र घबराट पसरली असून, जीवित रक्षणासाठी कुटुंबे उत्तर गाझा पट्टीवरून पळ काढत आहेत. इस्रायल व हमास यांच्यातील संघर्षाचा आता सातवा दिवस आहे. दोन्ही बाजू माघार घेण्यास तयार नाहीत. पलेस्टिनमधील मृतांचा आकडा आता १७२ वर पोहोचला असून, आतापर्यंत १७ हजार लोकांनी विविध ठिकाणी आश्रय मागितला आहे असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. इस्रायलने केलेल्या दाव्यानुसार हमासने १३० रॉकेटचा मारा केला आहे, त्यातील २२ रॉकेट इस्रायलच्या क्षेपणास्त्र संरक्षण डोमने नष्ट केली आहेत. हमासने गेल्या सहा दिवसांत ९७१ रॉकेट इस्रायलमधील विविध लक्ष्यांवर फेकले आहेत. प्रत्युत्तर म्हणून इस्रायल गाझा पट्टीवरील हमासच्या लक्ष्यांवर हल्ले करत आहे. हमासच्या ड्रोन विमानाने आपले पॅट्राइट क्षेपणास्त्र नष्ट केले असा इस्रायलचा दावा आहे. दोन्ही बाजूच्या सहा दिवसांच्या संघर्षात १७२ लोक मरण पावले आहेत. त्यातील ७७ टक्के नागरिक आहेत, असा संयुक्त राष्ट्राचा निष्कर्ष आहे. इस्रायलमधील नागरिकांत जीवितहानी झालेली नसली तरीही गाझा पट्टीजवळील लहान मुलांच्या बालवाड्या, मोठ्या मुलांच्या शाळा व कॉलेजे बंद करण्यात आली आहेत. (वृत्तसंस्था)
इस्रायल, हमासचा संघर्ष चालूच
By admin | Published: July 15, 2014 1:50 AM