इस्त्रायल आणि लेबनान यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. त्यातच इस्त्रायलच्या होम फ्रंट कमांडने राजधानी तेल अवीव आणि विशेषत: उत्तरेकडील भागात राहणाऱ्या नागरिकांवर नवीन निर्बंध लावले आहेत. शाळा, कार्यालये यांच्या आसपास सुरक्षित ठिकाण निर्माण करणार नाहीत तोवर बंद ठेवण्याचे आदेश आहेत.
कुठल्याही हल्ल्यावेळी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय देण्याची व्यवस्था उभारण्यात येत आहे. लोकांना जमावबंदीचे आदेश आहेत. कुठल्याही इमारतीत ३०० हून अधिक लोकांना राहण्यास मनाई आहे. तर बाहेर ३० पेक्षा अधिक लोकांनी एकत्रित येण्यास बंदी आहे. लेबनानी सीमेजवळील समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांवर पूर्ण निर्बंध लावण्यात आले आहेत.
४८ तासांसाठी इस्त्रायलमध्ये आणीबाणी
सध्याची परिस्थिती पाहता इस्त्रायली पंतप्रधानांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. इस्त्रायलचे संरक्षण मंत्री योआव गॅलेंट यांनी पुढील ४८ तासांसाठी आणीबाणी घोषित केली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी उत्तरेकडील स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. स्थानिक वृत्तपत्रानुसार, आम्ही देशातील नागरिकांचे रक्षण करणे आणि उत्तरेकडील लोकांना सुरक्षित त्यांच्या घरी आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जो कुणी आम्हाला नुकसान पोहचवेल आणि आम्हीही त्याला उत्तर देऊ असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
दरम्यान, इस्त्रायली सैन्याने इराण समर्थक हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून हिजबुल्लाहनं लेबनानहून इस्त्रायलच्या दिशेने ३२० रॉकेट डागले आहेत. मिसाईल आणि स्फोटक ड्रोन हल्ल्याची जबाबदारी घेत हिजबुल्लाहनं त्यांचा कमांडर फुआद शुक्रच्या हत्येचा बदला म्हणून हा हल्ला केल्याचं म्हटलं आहे.
अमेरिकेची करडी नजर
जसंजसं इस्त्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील तणाव वाढत आहे तसं अमेरिकन राष्ट्रपती ज्यो बायडन हे या घटनांवर बारकाईने नजर ठेवून आहेत. वरिष्ठ अमेरिकन अधिकारी इस्त्रायलमधील अमेरिकन राजदूतांसोबत संपर्कात आहेत. आम्ही सीमांच्या रक्षणासाठी काम करतोय. इस्त्रायलला स्वत:चं संरक्षण करण्याचा अधिकार आहे असं समर्थन अमेरिकेने केले आहे.