Israel Hezbollah War: मागील काही दिवसांपासून शांत झालेले इस्रायल-हिजबुल्ला युद्ध पुन्हा पेटले आहे. आज(22 ऑक्टोबर 2024) हिजबुल्लाहने मध्य इस्रायलमध्ये पुन्हा हल्ला केला. इस्रायलच्या सर्वात दाट लोकवस्तीच्या भागात हिजबुल्लाहने अनेक रॉकेट डागले. मात्र, हे हल्ले इस्रायलने हवेतच परतून लावल्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. आता इस्रायलकडून याला तीव्र उत्तर दिले जाऊ शकते.
काय म्हणाले इस्रायली लष्कर?इस्रायली लष्कराने सांगितले की, लेबनॉनमधून इस्रायलवर पाच रॉकेट डागण्यात आले, ते सर्व इस्रायलच्या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेने हवेतच नष्ट केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर आता इस्त्रायलने लेबनॉनमध्ये हल्ले वाढवले आहेत. हिजबुल्लाहद्वारे चालवल्या जाणाऱ्या वित्तीय संस्थेला लक्ष्य केले जात आहे. तर, हमास नेता याह्या सिनवारच्या मृत्यूनंतर गाझामध्ये युद्धविराम चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेने दबाव आणला आहे.
काय म्हणाले हमास?इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासचा नाश करण्याची आणि गटाने ओलिस ठेवलेल्या डझनभर लोकांना मुक्त करण्याची शपथ घेतली आहे. तर, कायमस्वरूपी युद्धविराम, गाझामधून इस्रायली सैन्याची पूर्ण माघार आणि पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका, या बदल्यातच ओलीसांची सुटका होईल, असे हमासचे म्हणणे आहे.
हमासचा भीषण हल्लागेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात सुमारे 1,200 लोक मारले गेले आणि 250 जणांचे अपहरण करण्यात आले होते. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गाझामध्ये इस्रायलच्या प्रतिहल्ल्यात 42,000 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. युद्धाने गाझाचा बहुतांश भाग उद्ध्वस्त केला आहे आणि 2.3 दशलक्ष लोकसंख्येपैकी 90 टक्के लोक विस्थापित झाले आहेत.