Israel targets Hezbollah in Lebanon: इस्रायल आणि दहशतवादी संघटना हिजबुल्ला यांच्यातील तणाव अद्यापही शमलेला दिसत नाही. इस्रायलने रविवारी लेबनानची राजधानी बेरूतवर हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात इस्रायलने हिजबुल्लाचा मुख्य प्रवक्ता ठार केला. मुख्य प्रवक्ता मोहम्मद अफिफ मारला गेल्याची पुष्टी इस्रायल संरक्षण दल आणि हिजबुल्ला या दोघांनी केली आहे. आयडीएफने एका निवेदनात म्हटले आहे की, अफिफ हिजबुल्लाहच्या लष्करी कारवायांवर लक्ष ठेवून असायचा. त्याच्या मार्गदर्शनाखाली काही महत्त्वाच्या गोष्टी घडवून आणल्या गेल्या. तसेच इस्त्रायलवर हल्ले करण्यासाठी हिजबुल्लाहच्या गटाला त्याने उत्तेजन दिले. त्यामुळे त्याला ठार मारल्याचे इस्रायलच्या संरक्षण दलाने स्पष्ट केले.
हिज्बुल्लाचे म्हणणे काय?
हिजबुल्लाने आपल्या मुख्य प्रवक्त्याच्या मृत्यूनंतर सांगितले की ज्या इमारतीत अफिफला लक्ष्य करण्यात आले होते, त्या इमारतीत सीरियन बाथ पार्टीचे कार्यालय होते. आयडीएफने हल्ल्यापूर्वी कोणताही इशारा दिला नव्हता, असेही ते म्हणाले. इस्रायलने इशारा न देता हल्ला केला कारण त्यांना ही हत्या करायची होती आणि हिजबुल्लाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केले गेले. हिजबुल्लाचा नेता हसन नसराल्लाह याच्या मृत्यूनंतर तसेच सप्टेंबरमध्ये इस्त्रायलने लेबनानवर केलेल्या हल्ल्यांनंतर अफिफ प्रकाशझोतात आला. गेल्या महिन्यात आयडीएफचे प्रवक्ते कर्नल अविचाई अद्राई यांनी हवाई हल्ल्यापूर्वी परिसरातील रहिवाशांना बाहेर काढण्याचे आदेश जारी केले. यानंतर अफिफ म्हणाला होता की, धमक्या आणि बॉम्बस्फोटांना आम्ही घाबरत नाही. आमचा संकल्प मजबूत आहे.
हिजबुल्लाच्या ५० दहशतवादी तळांना केलंय लक्ष्य
लेबनानमध्ये रविवारी झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने सांगितले की त्यांनी दहियाहमधील हिजबुल्लाच्या स्थानांवर हवाई हल्ले केले आहेत. लष्कराच्या म्हणण्यानुसार, लढाऊ विमानांनी कमांड रूम आणि इतर पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केले. स्ट्राइकपूर्वी आयडीएफने नागरिकांना परिसर सोडण्याचा इशारा दिला होता. गेल्या काही दिवसांत इस्रायलने हिजबुल्लाच्या ५० दहशतवादी तळांना लक्ष्य केले आहे. तसेच लेबनानने रविवारी उशिरा सांगितले की, देशाच्या दक्षिणेकडील टायरच्या हिजबुल्लाच्या तळावर झालेल्या हल्ल्यात ११ लोक ठार आणि ४८ जखमी झाले.