Israel-Iran Conflict : गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले इस्रायल-हमास युद्ध अधिक तीव्र झाले आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये राहणारा हमास नेता इस्माईल हानिया याच्या हत्येनंतर मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. हानियाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रविवारी(दि.4) पहाटे लेबनॉनमधून इस्रायलवर डझनभर क्षेपणास्त्रे डागण्यात आली. पण, इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेने सर्व क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने संपूर्ण देशात रेड अलर्ट जारी केला आहे.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) हानियाच्या हत्येशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र डागून हमास प्रमुखखाची हत्या केली. हे क्षेपणास्त्र 7 किलो स्फोटकांनी भरलेले होते. याआधी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये हानियाचा मृत्यू बॉम्बस्फोटात झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, आयआरजीसीने या हल्ल्यात इस्त्रायलची थेट भूमिका असल्याचा ठपका ठेवला आहे.
'भारताने इस्रायलला शस्त्रे देणे थांबवावे', राजनाथ सिंह यांना पत्र लिहून कोणी केली मागणी..?
हमास प्रमुख हानियाच्या हत्येनंतर अनेक देशांमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत. गाझाला लागून असलेल्या जॉर्डनमध्ये शनिवारी हजारो लोकांनी रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त केला आणि इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजी केली. परिस्थिती लक्षात घेऊन अमेरिका आणि ब्रिटनने आपल्या नागरिकांना लेबनॉन सोडण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी भारतानेही आपल्या नागरिकांना लेबनॉन सोडण्यास सांगितले होते. सध्या मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत नाजूक वळणावर आहे. येथे कधीही युद्ध सुरू होऊ शकते. इस्रायलनेही आपल्या देशात रॉकेट हल्ल्याबाबत रेड अलर्ट जारी केला आहे.
इराकची राजधानी बगदादमध्येही असेच चित्र पाहायला मिळाले. या निषेध मोर्चात हजारो महिलाही सहभागी झाल्या होत्या. पॅलेस्टिनी ध्वज आणि हानियाचा फोटो हातात घेऊन त्यांनी इस्रायलच्या विरोधात घोषणा दिल्या. हानियाच्या हत्येविरोधात तुर्कस्तानमधील इस्तंबूलमध्येही लोकांनी निदर्शने केली. यावेळी सर्वत्र पॅलेस्टाईन आणि तुर्कस्तानचे झेंडे हातात घेऊन सर्वांनी इस्रायलच्या विरोधात घोषणा दिल्या.