इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने इस्रायलवरील हल्ल्यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. हानिया आणि हसन नसराल्लाह यांच्या मृत्यूचा बदला म्हणून हे हल्ले करण्यात आल्याचे इराणने आपल्या या निवेदनात म्हटले आहे. तसेच आपण इस्रायलच्या लष्करी आणि संरक्षण संस्थांना लक्ष्य केले होते, असा दावाही इराणने केला आहे.
स्वसंरक्षणाच्या अधिकारानुसार आपण इस्रायलवर हल्ला केला -इराणला या हल्ल्यांची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे इस्रायलने म्हटले आहे. यावर, आपल्याला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. आपण स्वसंरक्षणासाठी पूर्णपणे तयार आहोत. संयुक्त राष्ट्र चार्टरच्या अनुच्छेद 51 मध्ये अंतर्भूत असलेल्या स्वसंरक्षणाच्या अधिकारानुसार आपण इस्रायलवर हल्ला केला आहे, असे इराणने म्हटले आहे.
इस्रायलच्या हल्ल्यांवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह -पॅलेस्टाइनी, लेबनॉन आणि सीरिया यांच्यावर इस्रायलकडून वारंवार लष्करी हल्ले होत आहेत. अशा परिस्थितीत इराणने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, दीर्घकाळ संयम बाळगल्यानंतर, स्वसंरक्षणाच्या अधिकाराचा अवलंब करणे, हे प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसंदर्भात आपली जबाबदार वृत्ती दर्शवते.
संयुक्त राष्ट्र परिषदेला केलं आवाह -इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणने नैतिक सिद्धांत आणि इस्लामच्या उच्च शिकवणीप्रमाणे आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यांनुसार भेदभावाच्या सिद्धांताचे संपूर्ण पालन करत, आपल्या स्वसंरक्षणात्मक मिसाइल हल्ल्यांत, प्रामुख्याने सरकारच्या सैन्य आणि सुरक्षा आस्थापनांना निशाना बनवले असल्याचे इराणने म्हटले आहे. तसेच, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणने, इस्रायलच्या बेजबाबदार कृतीला आळा घालण्यासाठी, आर्थिक आणि लष्करी मदत करणाऱ्यांना रोखण्यासाठी आणि तिसऱ्या पक्षाच्या सहभागाविरुद्ध चेतावणी देत, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला आवाहन केले आहे.
आपल्या स्वसंरक्षणासाठी कुठलेही पाऊल उचलायला तयार -याच बरोबर, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण कुठल्याही आक्रमक लष्करी कारवाई आणि बळाच्या बेकायदेशीर वापराविरुद्ध आपल्या कायदेशीर हितसंबंधांचे आणि प्रादेशिक अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी, आवश्यकता भासल्यास, यापुढेही संरक्षणात्मक पाऊल उचलण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि यासंदर्भात कसल्याही प्रकारची कारवाई करण्यास मागेपुढे बघणार नाही.