इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा पट्टीत हमासच्या सुरू असलेल्या बॉम्बहल्ला दरम्यान पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. हमासचे सर्व सदस्य मृत्यूच्या जवळ आहेत असं म्हटलं. बुधवारी राष्ट्राला संबोधित करताना ते म्हणाले की, हमासचा खात्मा करणे आणि ओलीस ठेवलेल्या लोकांना मायदेशी आणणे हे इस्रायलचे मुख्य ध्येय आहे.
बेंजामिन नेतन्याहू यांनी देश आपल्या अस्तित्वासाठी लढत आहे आणि गाझामध्ये जमिनीवर हल्ला करण्याची तयारी केली जात आहे असं सांगितलं. राष्ट्रीय एकात्मतेचे आवाहन करताना ते म्हणाले की, "जमिनीच्या वर असो वा जमिनीच्या खाली, गाझाच्या आत असो वा बाहेर, सर्व हमास सदस्यांचा मृत्यू जवळ आला आहे."
"संरक्षण मंत्री याओव गॅलेंट, मंत्री बेनी गँट्झ, सुरक्षा मंत्रिमंडळ, चीफ ऑफ स्टाफ आणि इतर एजन्सीचे प्रमुख यांच्यासमवेत आम्ही विजय मिळेपर्यंत युद्धाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चोवीस तास काम करत आहोत आणि राजकीय नफा-तोटा याचा विचार न करता काम करत आहोत."
"देश वाचवणे आणि विजय मिळवणे हे आमचे ध्येय आहे. आम्ही हमासचा नाश करत आहोत आणि आम्ही हजारो दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे आणि ही फक्त सुरुवात आहे. आम्ही जमिनीवर हल्ला करण्याच्या तयारीत आहोत. कधी, कसे, किती हे मी सांगणार नाही. आम्ही आमच्या सैनिकांचे प्राण वाचवू शकतो म्हणून हे आहे."
इस्रायल जमिनीवर हल्ला करण्याच्या तयारीत
7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्यापासून इस्रायल गाझामध्ये जमिनीवर हल्ला करण्याची योजना आखत आहे. यासाठी 3.5-4 लाख सैनिकही तैनात करण्यात आले आहेत. हमासची इस्लामिक स्टेटशी तुलना करताना नेतन्याहू म्हणाले की, जेव्हा आम्ही गाझामध्ये लढाई सुरू ठेवतो तेव्हा आम्ही खुनी आणि अत्याचार करणाऱ्यांकडून पूर्ण किंमत वसूल करून घेऊ.
गाझामधील नागरिकांना पुन्हा एकदा दक्षिण गाझामध्ये जाण्याचे आवाहन केले. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) चे प्रवक्ते रिअर एडमिरल डेनियल हेगारी यांनी सांगितले की, लष्कराने गाझा पट्टीमध्ये जमिनीवरील हल्ल्यासाठी आपली स्थिती सुधारण्यासाठी हवाई हल्ले तीव्र केले आहेत. दुसरीकडे नेतान्याहू म्हणाले की, त्या दिवशी काय घडले याच्या चौकशीला सामोरे जाण्यास ते तयार आहेत परंतु युद्ध संपेपर्यंत ही चौकशी होऊ नये.