Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अद्याप थांबण्याचे नाव घेत नाहीये. गाझामध्ये इस्रायलला आणखी एक यश मिळाले आहे. मंगळवारी IDFने वृत्त दिले की खान युनिसमधील हमासच्या एलिट नुखबा फोर्सचा कमांडर अब्द अल-हादी सबा दक्षिण गाझामधील खान युनिस भागात ठार झाला. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान अब्द अल-हादी साबाने किबुत्झ नीर ओझवर हल्ल्याचे नेतृत्व केले होते असे लष्कर आणि शिन बेटचे म्हणणे आहे. खान युनूस येथील मदत छावणीवर ३१ डिसेंबर रोजी इस्रायली सैन्याने केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल-हादी मारला गेल्याचा दावा लष्कराने केला आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, अल-हादीचा ७ ऑक्टोबरला किबुत्झनीर ओझवरील हल्ला आणि डझनभर लोकांना पकडण्यात तसेच गाझा युद्धादरम्यान इस्रायली सैन्यावर झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये सहभाग होता.
७ ऑक्टोबर हल्ल्यातील गुन्हेगारांचा खात्मा
अल-हादीचा खात्मा करणे हा शिन बेटच्या ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा करण्याच्या कारवाईचा एक भाग होता. गाझावरील हल्ल्याची सुरुवात करताना, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यात भाग घेतलेल्या सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांना ठार मारण्याची शपथ घेतली होती. गाझा पट्टीमध्ये इस्रायलचे लष्करी आक्रमण ७ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या नवीन अंदाजानुसार, आतापर्यंतच्या हल्ल्यांमध्ये किमान ४५,५४१ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत आणि १,०८,३३८ जखमी झाले आहेत.
गेल्या आठवड्यात इस्रायली सैन्याने उत्तर गाझा येथील कमल अडवान हॉस्पिटलवर छापा टाकून ते पेटवून दिले होते. याशिवाय रुग्णालयाच्या संचालकाला अटक करण्यात आली होती. २४० संशयित दहशतवाद्यांना अटक केल्याचाही दावा लष्कराने केला आहे. मंगळवारी जारी केलेल्या संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे की इस्रायलने १२ ऑक्टोबर २०२३ ते ३० जून २०२४ पर्यंत किमान २७ रुग्णालये आणि १२ इतर वैद्यकीय सुविधांवर १३६ हल्ले केले आहेत.