दमास्कस : सीरियातील बशीर-अल्-असद यांचे सरकार बंडखोरांनी उलथविल्यानंतर तेथील लष्करी ठिकाणांवर इस्रायलने सोमवारी रात्रीपासून ३५०हून अधिक हल्ले केले. या कारवाईला ऑपेरशन बशान एरो असे नाव देण्यात आले आहे. त्याद्वारे असद राजवटीत स्थापन करण्यात आलेल्या लष्करी छावण्यांपैकी सुमारे ८० टक्के ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.
सीरियातील शस्त्रास्त्र साठे नष्ट करणे हाच या हल्ल्यामागील मुख्य उद्देश होता, असे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. इस्रायली नौदलाने अल् बायदा आणि लताकिया या बंदरांवरही हल्ला केला. तिथे सीरियाच्या नौदलाची असलेली १५ जहाजे नष्ट करण्यात आली. सीरियातील लष्कराची दारूगोळा कोठारे, शस्त्रसाठे, क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आदी गोष्टी इस्रायलने अनेक हल्ले चढवून नष्ट केली आहेत. या हल्ल्यांमुळे शहरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शस्त्रे हाती लागू नये म्हणून...बंडखोरांच्या हाती सीरियाच्या लष्कराची शस्त्रास्त्रे पडू नयेत तसेच त्याचा इस्रायलविरोधात वापर होऊ नये म्हणून ऑपरेशन बशान एरो ही कारवाई करण्यात आली. सीरियातील शस्त्रास्त्रे हस्तगत करण्याचा हिजबुल्लाहचा प्रयत्न होता. सीरियावर केलेले हल्ले हे मर्यादित स्वरूपाचे व काही तात्कालिक कारणांसाठी करण्यात आले, असे इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
अमेरिका, इस्रायलचे कारस्थान : इराणइराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी सांगितले की, सीरियात नुकत्याच झालेल्या घटना, तेथील असद सरकार उलथविण्याचा घडलेला प्रकार आणि नंतर करण्यात आलेला हल्ला हा अमेरिका आणि इस्रायलच्या कारस्थानाचा भाग आहे. तसे आमच्याकडे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला.