तेल अवीव : गाझामधील आठ महिन्यांपासून चाललेले युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेने पाठिंबा दिलेल्या प्रस्तावावर संशयाचे ढग जमा झाले, जेव्हा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, ते फक्त अंशत: सहमत आहेत. युद्ध संपुष्टात येणार नाही. दुसरीकडे त्यांनी लेबनॉनचा दहशतवादी गट हिजबुल्लाचा सामना करण्यासाठी उत्तर सीमेवर आणखी सैन्य पाठवण्याचे काम सुरू केले आहे. नेतन्याहू यांच्या वक्तव्यामुळे हमासने ओलिस ठेवलेल्यांच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली. रविवारी रात्री उशिरा इस्रायली चॅनल १४ वर प्रसारित झालेल्या एका मुलाखतीत नेतान्याहू म्हणाले की, ते आंशिक तोडगा काढण्यासाठी तयार आहेत.
त्याद्वारे आम्ही काही ओलिसांना परत मिळवू शकतो. गाझापट्टीमध्ये अजूनही ओलिस ठेवलेल्यांची संख्या १२० आहे. परंतु हमासचा नायनाट करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विराम देऊन युद्ध सुरू ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. मी हार मानायला तयार नाही. इस्रायल आणि हमास ताज्या युद्धविराम प्रस्तावावर चर्चा सुरू असताना युद्ध संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मध्यस्थांना आणखी एक धक्का बसू शकतो. नेतन्याहू यांनी मुलाखतीत सांगितले की, लढाईचा सध्याचा टप्पा संपत आहे, परंतु याचा अर्थ युद्ध संपले, असे नाही.
सैनिक आता लढणार हिजबुल्लाविरुद्ध
मुलाखतीत नेतान्याहू म्हणाले की, गाझाच्या दक्षिणेस असलेल्या रफाह शहरामध्ये सैन्य आपली सध्याची मोहीम पूर्ण करण्याच्या जवळ पोहोचले आहे, याचा अर्थ हमासविरुद्धचे युद्ध संपले असे नाही. परंतु गाझामध्ये कमी सैन्याची आवश्यकता असेल, ज्यामुळे त्यांना हिजबुल्लाविरुद्ध लढण्याची संधी मिळेल.
नेतान्याहू यांनी लेबनॉनमधील दहशतवादी गट हिजबुल्लाचा सामना करण्यासाठी इस्रायलच्या उत्तर सीमेवर आणखी सैन्य पाठवण्याचे काम सुरू केले आहे. नेतान्याहूंच्या ताज्या भूमिकेमुळे आणि वक्तव्यांमुळे दोन्ही देशांत तणाव वाढण्याची शक्यता आहे.