Israel Hamas War, attacks on Rafah: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. गाझापट्टीत दोन्ही बाजूने हल्ले केले जात आहे. या युद्धात अनेक निष्पाप पॅलेस्टाइन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हमासने इस्रायलचे अनेक नागरिक ओलीस ठेवले आहेत. तर इस्रायलकडून हमासचे लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी हल्ले केले जात आहेत. तशातच आता इस्रायलने गाझा पट्टीतील राफा शहरात आक्रमकपणे लष्करी कारवाई सुरू केली आहे. तसेच, आता इस्रायल विजय झाल्याशिवाय हल्ले थांबणार नाहीत, असे मोठे वक्तव्य इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केले आहे.
आम्ही राफामध्ये कारवाई सुरू केली आहे. हमासचे ध्वज काढून इस्रायली ध्वज लावण्यात आले आहेत. आमचा विजय होईपर्यंत कारवाई सुरूच राहील, असे नेतन्याहून म्हणाले आहेत. 7 महिन्यांच्या युद्धानंतर हमासने युद्धविराम प्रस्ताव स्वीकारला आहे. पण इस्रायलने मात्र राफावरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. सोमवारी हमासने इस्रायलच्या प्रतिक्रियेची वाट पाहत असल्याचे म्हटले होते. मात्र शांततेच्या मार्गाऐवजी इस्रायलने राफामध्ये हल्ले सुरु केले.
युद्धविरामाबाबत हमासने सर्व अटी मान्य केल्याची माहिती देण्यात आली होती. यावर इस्रायलने सांगितले की, हमासने ज्या प्रस्तावांना सहमती दर्शवली ते अतिशय छोटे प्रस्ताव आहेत. हमासला केवळ दिखावा करायचा आहे. त्यांनी युद्धविरामाचा प्रस्ताव स्वीकारला आहे हे हमासला आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवून द्यायचे आहे. पण इस्रायलच्या प्रस्तावात ओलीसांची सुटका, पॅलेस्टाइन कैद्यांची सुटका, गाझाला मानवतावादी मदत पोहोचवणे आणि दक्षिण गाझा, मध्य गाझामधून आपले सैन्य मागे घेणे या अटींचा समावेश होता.
दरम्यान, सीएनएनने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, हमासने स्वीकारलेल्या प्रस्तावादरम्यान निर्माण होणाऱ्या अडथळ्यांबाबत मध्यस्थांनी पुन्हा चर्चा सुरू केली आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक शिष्टमंडळ कैरोला पाठवत असल्याची घोषणा केली आहे. इस्रायलचे अधिकारीही कैरोला पोहोचले आहेत. पण राफामध्ये इस्रायलचे हल्ले सध्या तरी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.