Israel-Hamas War: गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. सीमावर्ती गाझा पट्टीवर इस्रायलकडून सातत्याने हल्ले होत आहेत. यातच आता हमास शासित गाझा पट्टीवर अणुबॉम्ब टाकणे, हा आमच्यासाठी एक पर्याय आहे, असे विधान इस्रायलच्या एका मंत्र्याने केले आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांना सरकारी बैठकांमधून निलंबित केले आहे.
एका रेडिओ मुलाखतीत मंत्री अमिचाई एलियाहू म्हणाले की, गाझामध्ये मानवतावादी मदत पोहोचवणे अपयशी ठरेल. गाझा पट्टीवर अण्वस्त्र हल्ला एक पर्याय असू शकतो का? असे विचारले असता त्यांनी होकार दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आघाडी आणि विरोधी पक्षांमध्ये नाराजी पसरली आणि त्यांना बडतर्फ करण्याची मागणी होऊ लागली. गदारोळानंतर एलियाहू यांनी आपले विधान मागे घेत याला प्रतिकात्मक टिप्पणी म्हटले. तसेच, आमचे सरकार दहशतवादाविरोधात कठोर पाऊले उचलणार असेही सांगितले.
नेतन्याहू सभांमधून निलंबितदरम्यान, इस्रायलच्या पीएमओने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, पंतप्रधान नेतन्याहू यांनी एलियाहू यांना सरकारी बैठकांमधून अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी एलियाहूच्या विधानाला निराधार म्हटले. विरोधी पक्षनेते यायर लॅपिड यांनीही एलियाहूच्या टिप्पण्यांना भयावह आणि वेडेपणाचे म्हटले आहे.