7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा आज दहावा दिवस आहे. हमासच्या ठिकाणांवर इस्रायलचे हवाई हल्ले सुरूच आहेत. त्याचवेळी गाझा पट्टीतून हमास आणि लेबनानमधून हिजबुल्लाह इस्त्रायलवर सातत्याने रॉकेट डागत आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये आतापर्यंत 2799 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 724 हून अधिक मुलं आणि 370 हून अधिक महिलांचा समावेश आहे. तर 10 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टीतील शहरं उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. सर्वत्र इमारतींचे ढिगारे आणि मृतदेहांचे ढीग दिसत आहेत. 5 लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. रुग्णालयांमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी जागाच उरलेली नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत आईस्क्रीम ट्रक आणि खाद्यपदार्थांची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये मृतदेह ठेवण्यात येत आहेत. त्याच वेळी, हमासच्या हल्ल्यात सुमारे 1,400 इस्रायली मारले गेले आहेत.
युद्धाच्या 10 व्या दिवशी इस्रायली सैन्याने गाझा नागरिकांना 5 तास दिले आहेत. या काळात कोणतेही हल्ले होणार नाहीत जेणेकरून लोक दक्षिण गाझाच्या दिशेने स्थलांतर करू शकतील. गाझामध्ये घुसून इस्रायल जमिनीवर संघर्षासाठी तयार आहे. दुसरीकडे, पॅलेस्टिनी मीडियानुसार, कालची रात्र भयंकर होती. रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री इस्रायलने गाझा पट्टीवर जोरदार हल्ला केला. पॅलेस्टाईनच्या मते हा इस्रायलचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होता. मात्र, इस्रायलकडून अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हमासचा टॉप कमांडर बिलाल ठार; इस्लामिक जिहादचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त
इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात हमासचा आणखी एक मोठा कमांडर मारला गेला आहे. इस्रायली सैन्याने शनिवारी रात्री हवाई हल्ल्यात दक्षिण खान युनिस बटालियनमधील नहबा फोर्सचा टॉप कमांडर बिलाल अल-कदरा याला ठार केलं आहे. इस्रायलच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी शनिवारी रात्री गाझा पट्टीत हमास या दहशतवादी संघटनेच्या दक्षिण खान युनिस बटालियनवर हल्ला केला. मारला गेलेला दहशतवादी इस्रायलमधील अनेक लोकांच्या हत्येला जबाबदार होता. त्यानेच दक्षिण इस्रायलच्या किबुत्झ निरीम आणि निरोज भागातील घरांमध्ये घुसून लोकांचा शोध घेतला आणि त्यांची हत्या केली.