नवी दिल्ली: ७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा आज दहावा दिवस आहे. हमासच्या ठिकाणांवर इस्रायलचे हवाई हल्ले सुरूच आहेत. त्याचवेळी गाझा पट्टीतून हमास आणि लेबनानमधून हिजबुल्लाह इस्त्रायलवर सातत्याने रॉकेट डागत आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये आतापर्यंत २७९९ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ७२४ हून अधिक मुलं आणि ३७० हून अधिक महिलांचा समावेश आहे. तर १० हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
इस्रायल आता हमासचे रॉकेट, ग्रेनेड आणि मोर्टार नष्ट करण्यासाठी लेझर हल्ल्यांचा वापर करत आहे. प्रथमच, इस्रायलने आपली Iron Beam लेझर पॉइंट संरक्षण प्रणाली सक्रिय केली आहे. ही यंत्रणा दूरवरून येणारे ड्रोन, रॉकेट, क्षेपणास्त्रे, मोर्टार पाहते आणि आकाशातच नष्ट करते. इस्रायलने हे लेझर शस्त्र देशभरात तैनात केले आहे. काही वर्षे ते तैनात न करण्याची योजना होती, परंतु हमासचे हल्ले पाहता इस्रायलने ते आता सक्रिय केले.
Iron Beam लेझर पॉइंट संरक्षण प्रणालीने मध्य इस्रायलवर हमासची अनेक रॉकेट पाडली आहेत. त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. हे तंत्रज्ञान अतिशय कमी अंतराच्या इंटरसेप्शनसाठी तयार करण्यात आले होते. जेणेकरून मोर्टार, ड्रोन आणि आर्टिलरी शेल्स सोडता येतील. मात्र सध्या यापेक्षा जास्त अंतरावर रॉकेट सोडले जात आहेत. ही डायरेक्टेड एनर्जी वेपन एअर डिफेन्स सिस्टम आहे. इस्रायलने सर्वप्रथम २०१४ मध्ये सिंगापूर एअरशोमध्ये याबाबत माहिती दिली होती.
आयर्न बीम लेझर एअर डिफेन्स सिस्टीमची रचना कमी अंतरावरील रॉकेट, तोफखाना आणि मोर्टार बॉम्ब पाडण्यासाठी करण्यात आली होती. त्याची कमाल क्षमता ७ किलोमीटर आहे. पण वैशिष्ट्य म्हणजे त्याचा वेग आणि अचूकता खूप जास्त आहे. हे ड्रोन आणि यूएव्ही ओळखू शकते आणि त्यांच्यावर हल्ला करू शकते. आयर्न बीम हे इस्रायलच्या एकात्मिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचे सहावे शस्त्र किंवा तंत्रज्ञान आहे.