नवी दिल्ली: ७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा आज दहावा दिवस आहे. हमासच्या ठिकाणांवर इस्रायलचे हवाई हल्ले सुरूच आहेत. त्याचवेळी गाझा पट्टीतून हमास आणि लेबनानमधून हिजबुल्लाह इस्त्रायलवर सातत्याने रॉकेट डागत आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये आतापर्यंत २७९९ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ७२४ हून अधिक मुलं आणि ३७० हून अधिक महिलांचा समावेश आहे. तर १० हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
इस्रायलने हमासविरुद्ध आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. इस्रायलने लेबनॉनच्या सीमेवरून नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनूसार इस्रायल देशाच्या उत्तरेकडील लेबनीज सीमेच्या आत दोन किलोमीटरपर्यंतच्या परिसरात राहणाऱ्या २८ समुदायांना बाहेर काढत आहे आणि त्यांना सुरक्षित भागात सरकारी अतिथीगृहांमध्ये ठेवण्यास सुरुवात करत आहे. गेल्या काही दिवसांत गाझा पट्टीव्यतिरिक्त लेबनॉनमधूनही इस्रायलवर रॉकेट डागण्यात आले आहेत.
इराण समर्थित हिजबुल्ला संघटनेने हे हल्ले केले असून त्यांना योग्य प्रत्युत्तर दिले जात असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाच्या आपत्कालीन व्यवस्थापन सेवेने सांगितले की, लष्करी दलांनी लेबनॉन सीमेवरून लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. याआधी, लेबनॉन सीमेवरून झालेल्या हल्ल्यात एक इस्रायली नागरिक ठार झाला होता, तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. यानंतर इस्त्रायली हवाई दलाने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या काही अड्ड्यांवर बॉम्बफेक केल्याचे सांगितले.
हिजबुल्ला म्हणजे काय?
हिजबुल्ला ही एक दहशतवादी संघटना आहे, जी लेबनॉनच्या भूमीवर अस्तित्वात आहे. हे १९७५ ते १९९० पर्यंत चाललेल्या लेबनीज गृहयुद्धाचे उत्पादन मानले जाते. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने १९८२ मध्ये त्याची स्थापना केली होती. इराणमधील इस्लामिक क्रांतीचा इतर देशांमध्ये प्रसार करणे आणि लेबनॉनमध्ये लढणाऱ्या इस्रायली सैन्याविरुद्ध एक संघटना तयार करणे हे त्याचे ध्येय होते.
यूएस नॅशनल काउंटरटेररिझम सेंटर (NCTC) नुसार, हिजबुल्लाचा एप्रिल १९८३मध्ये बेरूतमधील यूएस दूतावासावर आत्मघाती ट्रक बॉम्बस्फोट, ऑक्टोबर १९८३मध्ये बेरूतमधील यूएस मरीन बॅरेक आणि बेरूतमधील यूएस दूतावास यासह अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग आहे. सप्टेंबर १९८४ मधील हल्ल्याचा समावेश आहे. यासोबतच १९८५ मध्ये TWA ८४७ विमानाचे अपहरण आणि १९९६ मध्ये सौदी अरेबियातील खोबर टॉवर्सवर झालेला हल्लाही यानेच घडवून आणला होता.