गाझा येथील हॉस्पिटलवर झालेल्या मोठ्या हल्ल्यानंतर आता एका चर्चवरही हल्ला झाला आहे. यामध्ये एक मुलगी आणि महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पॅलेस्टाईनने या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. बॉम्बस्फोटानंतर चर्चमध्ये चेंगराचेंगरी झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ल्यानंतर लोक हादरले. हमासनेही याबाबत एक निवेदन जारी केले असून इस्त्रायली सैन्याने चर्चला लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे.
गाझा आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गाझामधील एका चर्चवर बॉम्बस्फोट करण्यात आला, ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले. गाझा शहरातील सेंट पोर्फिरियस चर्च या ग्रीक चर्चजवळ हा स्फोट झाला. अनेक लोक जखमी आणि ठार झाल्याचा हमासचा दावा आहे. प्रत्यक्षदर्शींनी वृत्तसंस्थेला सांगितलं की, स्फोटामुळे चर्चच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं असून शेजारील इमारत देखील कोसळली आहे.
गाझामध्ये वाईट स्थिती! जखमींवरील उपचारात अडचण; डॉक्टर जमिनीवर करताहेत सर्जरी
गाझा शहरातील अल-अहली रुग्णालयावरील हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांवर उपचार करण्यात डॉक्टरांना अनेक अडचणी येत आहेत. वैद्यकीय साहित्याच्या कमतरतेमुळे त्यांना हॉस्पिटलच्या जमिनीवरच एनेस्थिसीया न देता जखमींवर सर्जरी करावी लागत आहे. इस्रायली बॉम्बफेक आणि परिसराची नाकेबंदी दरम्यान झालेल्या या हल्ल्यात रुग्णालयाजवळ आश्रय घेतलेल्या अनेकांचा मृत्यू झाला आहे.
डॉक्टरांनी जमिनीवर केली सर्जरी
डॉक्टरांनी हॉस्पिटलच्या जमिनीवर आणि हॉलमध्ये सर्जरी केल्या आहेत. बहुतेक सर्जरी एनेस्थिसीया न देता करण्यात आल्या. आम्हाला उपकरणं, औषध, बेड, एनेस्थिसीया आणि इतर गोष्टींची गरज आहे असं अबू सेल्मिया म्हणाले. रुग्णालयातील जनरेटरचे इंधन काही तासांत संपेल, त्यानंतर रुग्णालयातील काम ठप्प होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.