Israel Gaza News: इस्रायल आणि हमास यांच्या गेल्या १५ महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासंदर्भात सकारात्मक पाऊले उचलली गेली. पण, युद्ध थांबवण्यासाठी करार करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवून १५ तास होत नाही, तोच इस्रायलने शस्त्रसंधी धुडकावून लावत गाझा पट्टीवर हवाई हल्ले केले. इस्रायलने केलेल्या बॉम्ब वर्षावात महिला आणि लहान मुलांसह तब्बल ७३ नागरिकांचा मृत्यू झाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
SKY News आणि AFP या माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, गुरुवारी (१६ जानेवारी) इस्रायलने गाझावर हल्ला चढवत बॉम्ब टाकले. इस्रायलने केलेल्या या हवाई हल्ल्यात ७३ जणांचा मृत्यू झाला असून, २०० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये २० मुले आणि २५ महिलांचा समावेश
गाझा सिव्हील डिफेन्स एजन्सीचे प्रवक्ते महमूद बसल यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, "जेव्हापासून शस्त्रसंधी करण्याच्या कराराची घोषणा झाली आहे, तेव्हापासून इस्रायलच्या ऑक्युपेशन फोर्सच्या जवानांनी ७३ लोकांची हत्या केली. यात २० लहान मुलांचा आणि २५ महिलांचा समावेश आहे. इस्रायलचे सैन्य अजूनही बॉम्ब वर्षाव करत आहे."
७ ऑक्टोबर २०२३ पासून इस्रायल आणि हमास यांच्यात गाझापट्टीमध्ये युद्ध सुरू आहे. बुधवारी दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधी करण्याला सहमती दिली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी करारबद्दलच्या वृत्ताला दिला होता दुजोरा
२० जानेवारी रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनीही याला दुजोरा दिला होता. इस्रायल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शस्त्रसंधी कराराला अंतिम मंजुरी देण्यासाठी गुरुवारी इस्रायलच्या कॅबिनेटची बैठक होणार होती. पण, ऐनवेळी पंतप्रधान नेतन्याहू यांनी बैठकीला जाण्यास नकार दिला.
हमास शस्त्रसंधी करारातील शर्थीपासून मागे हटला आहे, असा आरोप पंतप्रधान नेतन्याहू यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला. त्यानंतर इस्रायलच्या हवाई हल्ल्यांचे वृत्त समोर आले.