ओफर लष्करी तुरुंग (वेस्ट बँक) : इस्रायल-हमास युद्धबंदी करारानुसार शनिवारी इस्रायलने आपल्या ताब्यात असलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांची गटागटाने सुटका करणे सुरू केले आहे, तर हमासनेही तीन इस्रायली ओलिसांची सुटका केली.
या युद्धबंदीमुळे इस्रायल-हमासदरम्यान १५ महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध थांबले असून, ओफर तुरुंगातून पॅलेस्टिनी कैद्यांना घेऊन एक बस वेस्ट बँककडे रवाना झाली. इतर सुमारे १५० कैद्यांना गाझाकडे नेले जात आहे.
पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनुसार, एकूण १८३ पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली जात असून, यात दीर्घ काळापासून तुरुंगात असलेले जन्मठेप झालेले कैदी तसेच गाझा भागातील १११ लोकांचा समावेश आहे. या लोकांना ७ ऑक्टोबर २०२३ रोजी अटक करण्यात आली होती.
दोन हजार कैद्यांची सुटका अपेक्षित
हमास-इस्रायलमधील करारानुसार सहा आठवड्यांत हमासने आपल्याकडील ३३ इस्रायली नागरिकांची, तर इस्रायलने सुमारे २ हजार कैद्यांची सुटका करावयाची आहे. हमासच्या ताब्यातील आठ इस्रायली नागरिकांचा एक, तर ७ऑक्टोबर २०२३च्या हल्ल्यात किंवा नंतर तेथील कैदेत मृत्यू झाला, असा इस्रायलचा दावा आहे.
अमेरिकी-इस्रायली रेड क्रॉसच्या ताब्यात
इस्रायलने आपल्याकडील पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका सुरू केल्यानंतर हमासनेही आपल्या ताब्यात असलेल्या अमेरिकी-इस्रायली नागरिक कीथ सिगल या ६५ वर्षीय नागरिकाची सुटका करून त्याला रेड क्रॉसच्या ताब्यात दिले. यापूर्वी हमासने अशाच दोन नागरिकांची सुटका केली होती.