तेल अवीव: गेल्या ११ दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये तीव्र संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळाले. हमासविरोधात इस्रायलने कारवाई करत चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, आता यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शस्त्रसंधीसाठी तयार असल्याची घोषणा केली. यानंतर पॅलेस्टाइनमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी जल्लोष केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, नेतन्याहू यांच्याविरोधात देशांतर्गत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, हमाससमोर गुडघे टेकल्याची टीका करण्यात येत आहे. (israel right wing criticises pm benjamin netanyahu for ceasefire with hamas palestine conflict)
पंतप्रधान नेतन्याहू यांच्या सुरक्षा मंत्रिमंडळाने गाझा पट्टीमधील ११ दिवसांची लष्करी कारवाई थांबवण्यासाठी शस्त्रसंधीला मंजुरी दिली. नेतन्याहू यांनी गाझामध्ये सुरू असलेली लष्करी कारवाईसह इतर देशांकडून शस्त्रसंधीसाठी सुरू असलेल्या दबावाच्या मुद्यावर सुरक्षा कॅबिनेटची बैठक बोलावली होती. त्यावेळी कॅबिनेट मंत्र्यांनी शस्त्रसंधीच्या बाजूने मतदान केले.
नेतन्याहू सरकारवर टीका
'न्यू होप'चे नेते गिदोन सार यांनी कॅबिनेटमधील निर्णयाच्या आधी नेतन्याहू सरकारवर टीका केली. शस्त्रसंधीनंतर हमास आणि इतर दहशतवादी गटांविरोधात सुरू असलेल्या इस्रायलच्या मोहिमेला गंभीर नुकसान होईल, असे त्यांनी म्हटले. हमासला आणखी मजबूत होण्यापासून रोखणे, गाझामध्ये अटक करण्यात आलेले इस्रायली सैनिकांची आणि नागरिकांच्या सुटकेशिवाय ही शस्त्रसंधी म्हणजे मोठे अपयश असल्याचे त्यांनी म्हटले.
Corona Vaccine वर नागरिकांची शंका; ‘या’ देशाने जाळले तब्बल २० हजार डोस!
हमास आता इस्रायलला धमकी देण्याच्या स्थितीत
उजव्या विचारांचे नेते आणि एविग्डोर लिबरमॅनचे अध्यक्ष इज्रियल बीटेनु सेजफायर यांनी नेतन्याहू सरकारचे आणखी एक अपयश असल्याचे म्हटले. दहशतवादी गटांबाबत मागील सरकारने नरमाईची भूमिका घेतली होती. त्यामुळे हमास आता इस्रायलला धमकी देण्याच्या स्थितीत आला आहे. नेतन्याहू यांनी हमासला अधिक मजबूत केले असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, नेतन्याहू यांच्यावर त्यांच्याच पक्षातून टीका सुरू झाली आहे. लिकुड पक्षाचे नेते आणि उपसंरक्षण मंत्री गॅडी येवरकन यांनी म्हटले की, २०१४ मध्ये हमासने ताब्यात घेतलेल्या इस्रायली सैन्यांचे मृतदेह आणि दोन इस्रायली नागरिकांच्या सुटकेशिवाय शस्त्रसंधी करणे हे दहशतवादाला पुरस्कार देण्यासारखे असल्याची टीका येवरकन यांनी केली.