गाझामध्ये सतत हल्ले करत असलेले इस्रायली सैन्य हमासचा पर्दाफाश करण्याची एकही संधी सोडत नाही. गाझामधील अल-शिफा या सर्वात मोठ्या रुग्णालयातील दहशतवादी तळाचा पर्दाफाश केल्यानंतर, IDF ने हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या 40 मुलांचे फोटो जारी केले आहेत. 7 ऑक्टोबर रोजी नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलवर झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी या मुलांना ओलीस ठेवलं आणि गाझा येथे आणलं. त्यानंतर त्यांचा शोध लागला नाही. इस्रायली लष्कराने या मुलांची छायाचित्रे जगासोबत शेअर करून हमासचे वास्तव समोर आणलं. यासोबतच जोपर्यंत हमासचा अंत होत नाही तोपर्यंत गाझामधून परतणार नाही अशी शपथ देखील घेतली आहे.
इस्रायल डिफेन्स फोर्सेसने याबाबत ट्विट केलं आहे. यामध्ये 30 हून अधिक मुलं हमासच्या दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत असं म्हटलं आहे. या मुलांच्या समोर त्यांच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली. त्यांचा निरागसपणा हिसकावून घेतला. या मुलांच्या डोळ्यात पाहा. त्यांच्या वेदना समजून घ्या. त्यांना कुटुंबासोबत राहायचं आहे. 44 दिवस झाले. दररोज, प्रत्येक मिनिटाला, ते आपल्या लोकांची वाट पाहत आहोत. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाकडे हमासवर कारवाई करण्याची मागणी करतो. आमच्या मुलांना घरी आणा. आमच्या मुलांना परत घेतल्याशिवाय आम्ही गाझामधून परत जाणार नाही" असं म्हटलं आहे.
13 कुटुंबातील 21 मुलं अनाथ
7 ऑक्टोबर रोजी हमासच्या 3000 हून अधिक दहशतवाद्यांनी इस्रायलच्या किबुत्झ शहरावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात इस्रायलचे सैन्य आल्यावर दहशतवाद्यांनी एक हजाराहून अधिक लोकांची निर्घृण हत्या केली. हमासने प्रचंड नरसंहार घडवला. यामध्ये 13 कुटुंबातील 21 मुले अनाथ झाली. यातील अनेक मुलांना दहशतवादी सोबत घेऊन गेले. यातील अनेक मुलांच्या पालकांची हत्या झाली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या या युद्धात अनेक लोकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. गाझामध्येही मोठ्या प्रमाणात मुलं अनाथ झाली आहेत.
गाझामध्ये दर 10 मिनिटाला 1 मुलाचा मृत्यू
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एदनोम घेब्रेयसस यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सांगितले की, "गाझा पट्टीमध्ये दर 10 मिनिटांनी एका मुलाचा मृत्यू होत आहे. कोणीही सुरक्षित नाही. गाझातील 36 रुग्णालयांपैकी निम्मी रुग्णालये आणि दोन तृतीयांश प्राथमिक आरोग्य केंद्रे उपचार देत नाहीत. गाझामधील आरोग्य सेवा यंत्रणांची अवस्था वाईट आहे. हॉस्पिटलचे कॉरिडॉर जखमी, आजारी लोकांनी भरले आहेत. शवगृहे भरली आहेत. भूल न देता शस्त्रक्रिया केल्या जात आहेत."