हमास आणि इस्रायलमधील युद्ध १५ व्या दिवशीही सुरू आहे. गाझा पट्टीतून कार्यरत असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेने दक्षिण इस्रायलवर प्राणघातक हल्ला केला, त्यानंतर दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धात आतापर्यंत चार हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर एकाच वेळी ५ हजारांहून अधिक रॉकेट डागले होते.
दरम्यान, इस्रायलच्या सुरक्षा प्रमुखांना ७ ऑक्टोबरच्या पहाटे हमासने केलेल्या विनाशकारी हल्ल्याची जाणीव झाली. ती हल्ला होण्याच्या दोन तास आधी. मात्र, हमासकडून एकाच वेळी ५ हजारहून अधिक रॉकेट डागले जातील, याची कल्पना इस्रायलच्या सुरक्षा प्रमुखांना नव्हती. इस्रायलच्या न्यूज चॅनल १२ ने आपल्या रिपोर्टमध्ये हा दावा केला आहे.
रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हल्ला होणार आहे, अशी माहिती इस्रायली सुरक्षा अधिकार्यांना गुप्तचर अहवालात मिळाली होती. मात्र, त्यांचे म्हणणे होते, हा हल्ला विनाशकारी हल्ल्यापेक्षा खूपच कमी प्रमाणात असेल. त्यामुळे इस्रायली अधिकाऱ्यांनी गुप्तचर माहिती गांभीर्याने घेतली नाही. दरम्यान, हमासचे दहशतवादी सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करू शकतात, एवढीच माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांना मिळाली होती.
यासोबतच, हमासचे दहशतवादी काही इस्रायली नागरिकांचे अपहरणही करू शकतात, असे सांगण्यात आले होते. तसेच,इस्रायली लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, आयडीएफ चीफ ऑफ स्टाफ हर्झी हालेवी आणि शिन बेटचे प्रमुख रोनेन बार हे गुप्तचर माहिती गोळा करण्यात सहभागी होते, असा दावा सुद्धा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
इस्रायलची कुठे चूक झाली?गुप्त माहिती मिळाल्यानंतर, अधिकाऱ्यांनी कथितरित्या हे प्रकरण सकाळपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेतला होता. यामुळेच इस्रायलने सीमेवरील आयडीएफ सैनिकांना सतर्क केले नाही किंवा रणगाडे पुढे सरकले नाहीत. तसेच, इस्रायली चॅनलने दावा केला आहे की, गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर शिन बेटद्वारे पाऊल उचलले आणि एक लहान ऑपरेशन टीम सीमा भागात पाठवण्यात आली. जेव्हा हम्साने इस्रायलवर हल्ला केला, तेव्हा ही टीम किबुत्झिममधील ऑपरेशनमध्ये सामील होती. हमासच्या दहशतवाद्यांनीही या टीमवर हल्ला केला.