गेल्या काही दिवसांपासून हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. गाझा पट्टीतून कार्यरत असलेल्या हमास या संघटनेने दक्षिण इस्रायलवर प्राणघातक हल्ला केला, त्यानंतर दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धात आतापर्यंत चार हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांनी बुधवारी सांगितले की, भारताने इतर अनेक देशांप्रमाणे हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना इस्रायलच्या राजदूत नाओर गिलोन यांनी हमासविरुद्धच्या दहशतवादविरोधी कारवायांमध्ये इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल भारताचे आभारही व्यक्त केले. तसेच, इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या क्रूर हल्ल्यानंतर संबंधित भारतीय अधिकाऱ्यांना हमासला दहशतवादी संघटना घोषित करण्याची विनंती केली आहे. यासोबतच हा मुद्दा यापूर्वीही उपस्थित करण्यात आल्याचे नाओर गिलोन यांनी सांगितले.
राजदूत नाओर गिलोन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महत्त्वाचे देश आमच्या पाठीशी आहेत. ही जगातील लोकशाही आहे. असे सांगून मला वाटते की भारताने हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे. अमेरिका, कॅनडा आणि युरोपीय संघासह अनेक देशांनी हमासला यापूर्वीच दहशतवादी संघटना घोषित केले आहे, असे नाओर गिलोन यांनी सांगितले.
याचबरोबर, नाओर गिलोन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणाऱ्या पहिल्या जागतिक नेत्यांपैकी एक होते. भारत हा जगातील महत्त्वाची नैतिक ओळख असलेला देश आहे आणि आपल्यासाठी महत्त्वाचे देश आपल्यासोबत आहेत. भारताने हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. तसेच, इस्रायलसाठी हे पश्चिम आशियातील अस्तित्वाचे युद्ध आहे. हमासचा नायनाट करण्यासाठी इस्रायल कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.