मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. इस्रायल आणि इराणमध्येही तणाव वाढला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायल गाझा पट्टीत हमास, लेबनॉनमधील हिजबुल्लाह आणि येमेनमधील हुथी बंडखोरांविरुद्ध लढत आहे. भारत आणि इस्रायलचे अनेक दशकांपासून चांगले संबंध आहेत. दोन्ही देश एकमेकांना मदतही करत असतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर काही लोक इस्रायलविरोधात संताप व्यक्त करत आहेत.
खरे तर, इस्रायलने अधिकृत नकाशात जम्मू-काश्मीरचा काही भाग पाकिस्तानात दाखवला होता. यानंतर लोकांनी सोशल मीडियावर इस्रायलला लक्ष्य केले. मात्र, यानंतर लगेचच इस्रायलच्या राजदूताने तात्काळ कारवाई करत हा नकाशा वेबसाइटच्या संपादकाची चूक असल्याचे स्पष्टिकरण देत साइटवरून हटवला.
यासंदर्भात, सोशल मीडिया यूजर अभिजीत चावडा यांनी एक्सवर पोस्ट केले होते की भारत इस्रायलच्या पाठीशी आहे, पण इस्रायल भारतासोबत आहे का? यासोबत अभिजीतने इस्त्रायली वेबसाइटने शेअर केलेल्या नकाशाचा फोटोही लावला. यात भारताच्या जम्मू-काश्मीरचा काही भाग पाकिस्तानात दाखवण्यात आला होता.
हे प्रकरण समोर आल्यानंतर, लोकांनी इस्त्रायलकडे तत्काळ चूक सुधारण्याची मागणी केली. तुहिन नावाच्या युजरने इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अकाऊंटला टॅग करत कृपया हे दुरुस्त करा असे लिहिले होते. याशिवाय यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.