Israel-Hamas War: गेल्या आठ-नऊ दिवसांपासून इस्रायल आणि हमास, यांच्यातील संघर्ष सुरू आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा केली आणि एक-एक करत हमासच्या ठिकाणांचा नाश केला. आता इस्रायल हल्ल्याच्या अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळेच त्यांनी गाझा पट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना उत्तर गाझातून दक्षिणेकडे जाण्यासाठी 3 तासांचा अवधी दिला आहे.
इस्रायलच्या सैन्याने सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, या परिसरात कोणतेही ऑपरेशन करणार नसल्याचे सांगितले होते. या काळात सर्व नागरिकांना उत्तर गाझा सोडून दक्षिणेकडे जाण्यास सांगितले. आम्हाला सामान्य लोकांच्या कुटुंबाची सुरक्षा महत्त्वाची आहे. हमासच्या नेत्यांनी आधीच त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. तात्काळ परिसर रिकामा करा, यानंतर आम्ही हल्ला करू, अशा सूचना इस्रायलच्या सैन्याकडून देण्यात आल्या आहेत.
इस्रायल लवकरच गाझा पट्ट्यात मोठा हल्लाय करण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळेच त्यांनी येथील नागरिकांना परिसर रिकामा करण्यास सांगितले आहे. आता इस्रायल काय करणार, याकडेच सर्व देशांचे लक्ष आहे. दरम्यान, आतापर्यंत दोन्ही बाजुने झालेल्या हल्ल्यात चार हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.