USS Gerald Ford: पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली. यानंतर आता अमेरिका इस्रायलच्या मदतीसाठी पुढे आला आहे. हमासशी सामना करण्यासाठी अमेरिकेने जगातील सर्वात मोठी, महागडी आणि हायटेक, शस्त्रास्त्रांनी सुसज्ज युद्धनौका इस्रायलला देण्याचा निर्णय घेतला आहे.
'USS गेराल्ड फोर्ड', असे या युद्धनौकेचे नाव आहे. ही युद्धनौका इस्रायलच्या दिशेने नेण्याचे आदेश अमेरिकन प्रशासनाने दिले आहेत. ही इतकी शक्तिशाली युद्धनौका आहे की, यात एकाच वेळी सुमारे पाच हजार सैनिक, 90 लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर वाहून नेता येऊ शकतात. ही युद्धनौका क्षेपणास्त्रांसह अनेक आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज आहे.
जगातील सर्वात आधुनिक युद्धनौका
अमेरिकेने $ 18 अब्ज खर्च करून तयार केलेली ही आधुनिक युद्धनौका आहे. प्रत्येक बाबतीत ही जगातील कोणत्याही जहाजापेक्षा पुढे असल्याचा दावा केला जातो. ही नौका 337 मीटर लांब, 78 मीटर रुंद आणि 76 मीटर उंच आहे. ही 90 लढाऊ विमाने आणि अत्याधुनिक हेलिकॉप्टर वाहून नेऊ शकते. वजन आणि आकाराने प्रचंड असूनही ही समुद्रात खूप वेगाने फिरते. नौकेचा वेग 56 किलोमीटर प्रति तास इतका आहे, जो समुद्रातील जहाजासाठी एक उत्कृष्ट वेग आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष गेराल्ड आर फोर्ड यांच्या नावावरून या नौकेला हे नाव देण्यात आले आहे. फोर्ड यांनी नौदलाचीही सेवा केली होती, म्हणूनच हे अत्याधुनिक जहाज त्यांना समर्पित करण्यात आले. याची भारतातील सर्वात मोठे जहाज, INS विक्रांतशी तुलना केल्यास, विक्रांत एकूण 45 हजार टन क्षमतेसह सेवेत आहे. हे 262 मीटर लांब, 62 मीटर रुंद आणि 59 मीटर उंच आहे. हे 36 विमाने आणि त्यावर 1650 अधिकारी आणि कर्मचारी घेऊन जाण्यास सक्षम आहे. यावरुन अमेरिकेच्या युद्धनौकेच्या आकाराचा अंदाज येईल.