इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझा पट्टीत ४३ जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 06:44 AM2021-05-13T06:44:57+5:302021-05-13T06:45:42+5:30
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी इस्रायलकडून गाझा पट्टीत शेकडो हवाई हल्ले करण्यात आले. या आधी हमास आणि इतर अतिरेकी संघटनांनी इस्रायलची राजधानी तेल अवीव आणि बीरशेबा या शहरावर हल्ले केले होते.
गाजा/जेरुसलेम : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील अतिरेकी संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या जोरदार धुमश्चक्रीमध्ये बुधवारी गाजा पट्टीत ४३ जण मृत्युमुखी पडले, तर इस्त्रायलमध्ये ५ जणांना जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली. २०१४ नंतर पहिल्यांदाच या दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर जोरदार हल्ले केले जात आहेत.
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी इस्रायलकडून गाझा पट्टीत शेकडो हवाई हल्ले करण्यात आले. या आधी हमास आणि इतर अतिरेकी संघटनांनी इस्रायलची राजधानी तेल अवीव आणि बीरशेबा या शहरावर हल्ले केले होते. याला जोरदार प्रत्युत्तर देताना इस्रायलकडून केलेल्या हल्ल्यांमध्ये गाझा पट्टीतील एक बहुमजली इमारत उद्ध्वस्त झाली. अन्य एका इमारतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. इस्रायलने दावा केला आहे की, आम्ही केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचे अनेक नेते ठार झाले आहेत. हमासच्या अनेक रॉकेट लाँच साईट्स आणि अतिरेकी नेत्यांची घरे हल्ल्यांमध्ये नष्ट करण्यात आली आहेत.