इस्रायलवर भयंकर हल्ला केल्यानंतर हमासने तेथून मोठ्या प्रमाणात लोकांचं अपहरण केलं आहे. गाझामध्ये लोकांना ओलीस ठेवण्यात आलं आहे. यामध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी संपूर्ण कुटुंबाचं अपहरण केल्याची अनेक प्रकरणं आहेत. एका कुटुंबातील दहा सदस्य हमासच्या ताब्यात आहेत. यामध्ये तीन लहान मुलींचाही समावेश आहे. हमासच्या हल्ल्यानंतर हे लोक बेपत्ता आहेत, त्यामुळे दहशतवाद्यांनी त्यांना ओलीस ठेवल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, हे कुटुंब इस्रायलच्या दक्षिण भागात असलेल्या किबुत्झमध्ये राहत होते. या घटनेची माहिती त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाने मंगळवारी दिली. हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी सकाळी 20 मिनिटांत 5000 रॉकेट डागून इस्रायलवर 50 वर्षांतील सर्वात मोठा हल्ला केला होता. यानंतर हमासचे दहशतवादी इस्रायलच्या दक्षिण भागात घुसले. घरांमध्ये घुसखोरी केली. त्यांनी रस्त्यावरील लोकांनाही लक्ष्य केले.
दहशतवाद्यांनी 150 हून अधिक लोकांना ठेवले ओलीस
दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर हत्याकांड घडवून आणले. लोकांना गोळ्या घालून ठार केले. महिलांवर बलात्कार झाल्याच्या आणि लोकांना जिवंत जाळल्याच्याही बातम्या आहेत. तसेच, दहशतवाद्यांनी 150 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले होते. या लोकांमध्ये या कुटुंबाचाही समावेश होता. ओलीस ठेवलेल्यांमध्ये इस्रायली वकील शेक्ड हॅरनचे आई-वडील, बहीण, भावजय, तीन लहान मुलं, काका आणि काकू यांचा समावेश आहे.
हॅरन आपली दोन मुलं आणि पतीसह अमेरिकेत सुरक्षित आहे. ती गरोदर आहे. तिची बॉस रुशैल गुर सांगते की, रविवारी जेव्हा तिने कुटुंबीयांना फोन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दुसऱ्या बाजूनेच फोन आला. हा फोन अपहरणकर्त्यांकडून असावे. तिने सांगितले की तिला अपहरणकर्त्याची भाषा नीट समजत नाही, परंतु त्याने 'किडनॅप्ड' आणि 'गाझा' असे दोन शब्द सांगितले.
"कुटुंबाची खूप काळजी वाटत आहे"
हॅरनचं कुटुंब किबुत्झ बे एरी येथे राहत होतं. हे ठिकाण गाझा पट्टीजवळ आहे. येथेच हल्ल्यानंतर हमासचे दहशतवादी घुसले. या आठवड्यात या ठिकाणाहून किमान 100 मृतदेह सापडले आहेत. हॅरनला आता तिच्या आई-वडिलांची आणि बाकीच्या कुटुंबाची खूप काळजी वाटत आहे. अपहरण झालेल्या तीन मुलींपैकी एक 3 वर्षांची, दुसरी 8 वर्षांची आणि तिसरी 12 वर्षांची आहे. तर इतर काही नातेवाईक इटलीचे नागरिक आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिेले आहे.