पेजर हल्ले, हवाई हल्ले करून इस्रायलने लेबनॉनमध्ये हाहाकार उडवून दिलेला असताना मंगळवारी रात्री लेबनॉनच्या हद्दीमध्ये सैन्य घुसविले आहे. इस्रायली सैन्याचे (आयडीएफ) हजारो सैनिक रातोरात लेबनॉनमध्ये रणागाडे, रॉकेट लाँचर घेऊन घुसले आहेत. आयडीएफने मंगळवारी पहाटे याची माहिती जगाला दिली आहे.
दक्षिणेकडील लेबनॉनमध्ये आमचे सैनिक घुसले असून हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले सुरु करण्य़ात आले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार हे हल्ले केले जात असल्याचे आयडीएफने म्हटले आहे.
२००६ नंतर पहिल्यांदाच इस्रायली सैन्य लेबनॉनमध्ये घुसले आहे. उत्तरेकडील सीमेवरील लेबनॉनी गावांमध्ये हा हल्ला करण्यात आला आहे. उत्तरेकडील इस्रायली नागरिकांना धोका निर्माण करण्यासाठी हिजबुल्ला या भागाचा वापर करत होता. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
आयडीएफ जनरल स्टाफ आणि नॉर्दर्न कमांडने मांडलेली पद्धतशीर योजना अंमलात आणणार आहे. यासाठी अलीकडच्या काही महिन्यांत सैन्य प्रशिक्षण आणि तयारी केली जात होती. इस्त्रायली हवाई दल या कारवाईत सैनिकांना मदत करत आहे.
इस्रायली सैन्याचे रणगाडे दक्षिण लेबनॉनमधील अनेक गावांमध्ये घुसले आहेत. अमेरिकेनेही आपल्याला सैन्य कारवाई करत असल्याचे इस्रायलने कळविले असल्याचे म्हटले आहे. तसेच इस्रायलने लोकांना बैरुत सोडण्याचा इशारा दिलेला आहे. लेबनॉनवर इस्रायली हल्ल्याच्या भीतीने लेबनीज सैन्याने सोमवारी रात्री 9 च्या सुमारास दक्षिण लेबनॉनमधील अनेक भागातून माघार घेण्यास सुरुवात केली आहे.