इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी रॉकेट हल्ल्यानंतर हमासच्या दहशतवाद्यांनी लोकांच्या घरात घुसून त्यांची हत्या केली होती. दक्षिण इस्रायलमधील येगेवमध्ये आयोजित एका म्युझिक फेस्टिवलमध्ये देखील ते गेले. येथूनही मोठ्या प्रमाणात लोकांचं अपहरण झालं. येथेच दहशतवाद्यांच्या क्रूरतेचे सर्वाधिक लोक बळी ठरले. या फेस्टिवलसाठी जगभरातून 3500 हून अधिक तरुण आले होते. येथे 260 हून अधिक मृतदेह सापडले आहेत.
आता एक कॉल रेकॉर्डिंग इस्रायल सरकारने जारी केलं आहे. या ऑडिओमध्ये एका मुलीचा आवाज ऐकू येतो. या मुलीला नंतर हमासच्या दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. दहशतवादी तिच्या समोर असताना, जेव्हा तिने एका ओळखीच्या व्यक्तीला फोन केला. यामध्ये ती म्हणते, त्यांनी माझ्या हाताला गोळी मारली आहे. शिमन, मी मरतेय... माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, तिच्या किंचाळ्या ऐका. तिच्या रडण्याचा आवाज ऐकू येतोय.
मुलीचा आवाज मनाला भिडणारा आहे. यावरून तिची भीती दिसते. ती खूप घाबरली होती. देशाच्या दक्षिण भागात असलेल्या येगेवमध्ये म्युझिक फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. हमासच्या दहशतवाद्यांनी आपल्या नागरिकांचे काय केले हे जगाला सांगण्यासाठी इस्रायली सरकार आपल्या सोशल मीडिया हँडलद्वारे अशा बातम्या सतत शेअर करत आहे. हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत 1300 हून अधिक इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आहे. तर प्रत्युत्तरादाखल गाझावरील हल्ल्यात 2200 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाल्याची माहिती आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
14 लोकांच्या कुटुंबात फक्त 4 वर्षांची मुलगी जिवंत
युद्धामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रुग्णालयामध्ये जेव्हा 4 वर्षांच्या मुलीने डोळे उघडले तेव्हा तिच्यासाठी दु:खद क्षण होता. जखमी मुलीच्या आसपास कोणीही नव्हतं. ती इकडे तिकडे पाहत राहिली पण कोणीच दिसलं नाही. तिच्या कुटुंबात 14 लोक होते, त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला. ती एकटी वाचली आहे. गाझामध्ये इस्रायलने टाकलेल्या बॉम्बमुळे तिचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. फुला अल-लहम नावाची ही मुलगी खान यॉनिस रुग्णालयात दाखल आहे. कुटुंबात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आई, वडील, बहीण आणि भावाचा समावेश आहे.