गाझावर इस्रायली सैन्याचा ग्राऊंड अटॅक कधीही सुरू होऊ शकतो. याच दरम्यान, पॅलेस्टाईनच्या मीडियाने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये इस्रायली सैनिक आनंदाने नाचताना दिसत आहेत. पॅलेस्टिनी समर्थक मीडिया संस्थेने केलेल्या या ट्विटमध्ये गाझावरील हल्ल्यापूर्वी इस्रायली सैनिक पॅलेस्टाईनच्या लोकांच्या मृत्यूचा आनंद साजरा करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या व्हिडिओबाबत पॅलेस्टिनी समर्थक मीडियाचा दावा आहे की, इस्रायली सैन्य गाझा सीमेजवळ आपली आक्रमकता साजरी करण्यासाठी पार्ट्यांचे आयोजन करत आहे आणि यामध्ये इस्रायली गायक ओमर एडम सैनिकांना पॅलेस्टिनी मुलं आणि महिलांवर हिंसाचार करण्यासाठी भडकावत आहे.
इस्रायली सैन्य गाझा पट्टीमध्ये ग्राउंड ऑपरेशनसाठी सज्ज आहे आणि ते फक्त आदेशांची वाट पाहत आहेत. इस्रायलने हमासविरुद्ध जमिनीवर कारवाई करण्याची पूर्ण तयारी केली असून त्यासाठी गाझा पट्टीला चारही बाजूंनी वेढा घातला आहे. सीमेवर मोठ्या प्रमाणात रणगाडे आणि तोफगोळे तैनात करण्यात आले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही गाझा सीमेवर पोहोचून लष्कराच्या तयारीबाबत आपल्या सैनिकांना प्रोत्साहन दिले होते.
हमासने डागले 5 हजार रॉकेट
हमासने 20 मिनिटांत इस्रायलवर 5 हजार रॉकेट डागल्यानंतर इस्रायल सरकारने युद्धाची घोषणा केली होती. गाझा पट्टीत 7 ऑक्टोबरपासून इस्रायली सैन्य आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत 5000 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 3500 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. या युद्धात दोन्ही बाजूंचे 13 हजार लोक जखमी झाले आहेत.
युद्धात आतापर्यंत 5000 लोकांचा मृत्यू
जवळपास दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात हमास आणि पॅलेस्टाईनला सर्वाधिक फटका बसला आहे. आतापर्यंत पॅलेस्टाईनमधील 3500 लोक मारले गेले आहेत तर हमासचे अनेक प्रमुख कमांडर मारले गेले आहेत. त्याचबरोबर इस्रायलमधील 1400 लोकांनी आतापर्यंत आपला जीव गमावला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.