हमास आणि इस्रायलमधील युद्ध १७ व्या दिवशीही सुरू आहे. गाझा पट्टीतून कार्यरत असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेने दक्षिण इस्रायलवर प्राणघातक हल्ला केला, त्यानंतर दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धात आतापर्यंत चार हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर एकाच वेळी ५ हजारांहून अधिक रॉकेट डागले होते. यानंतर इस्रायल हमासवर जोरदार मिसाइल हल्ले करत आहे.
गाझावर रात्रभर आणि सोमवारी पहाटे झालेल्या इस्रायली हल्ल्यात जवळपास ७० जणांचा मृत्यू झाल्याचे गाझा पट्टीमधील दहशतवादी संघटना हमासच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याचबरोबर, इस्त्रायली सैन्याने सांगितले की, त्यांनी २४ तासांत पॅलेस्टिनी भागातील सुमारे ३२० ठिकाणांवर हल्ले केले. हमास-नियंत्रित गाझा पट्टीच्या राज्य-संचालित मीडिया कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, रात्रीच्यावेळी झालेल्या इस्रायली हल्ल्यात ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १७ जणांचा उत्तर गाझामधील जबलिया येथील एका घरावर झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
रविवारी आम्ही हमासवर पहिल्यांदाच 'आयरन स्टिंग' मोर्टार हल्ला केल्याचे इस्रायलच्या संरक्षण दलाने म्हटले आहे. द जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, गाझा पट्टीमध्ये हा घातक मोर्टार हल्ला करण्यात आला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध आता आणखीनच घातक होताना दिसत आहे. गाझा शहरात सर्वत्र हाहाकार आहे. या युद्धात सातत्याने होत असलेल्या बॉम्ब आणि रॉकेटच्या वर्षावात गाझातील अनेक इमारती भूईसपाट झाल्या आहेत. यातच इस्रायलने रविवारी पहिल्यांदाच 'आयरन स्टिंग' मोर्टार डागल्यानंतर, हमासच्या दहशतवाद्यांमध्ये हाहाकार माजला आहे.
किती घातक आहे 'आयरन स्टिंग' मोर्टार? माध्यमातील वृत्तानुसार, 'आयरन स्टिंग'चा शोध एल्बिट सिस्टीमने लावला होता. यासंदर्भात २०२१ मध्ये सर्वप्रथम इस्रायलमध्ये संरक्षण मंत्रालय, IDF ग्राउंड फोर्सेस आणि एल्बिट यांनी याचा खुलासा केला होता. सर्वसामान्य नागरिकांना इज पोहोचण्याची शक्यता कमी करण्यासाठी. आपल्या निश्चित टार्गेटचा वापर करत मोर्टार मोकळ्या जागा तसेच शहरी वातावरणात वापरण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.