Israel Hamas War: अलीकडेच पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या अचानक हल्ल्याने सर्व काही उद्ध्वस्त झालं आहे. हजाराहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आणि हल्ल्यानंतर वेदनादायक फोटो समोर आले. इस्रायलनेही या हल्लाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायलच्या सततच्या बॉम्ब हल्ल्यामुळे २० लाख लोकसंख्या असलेला गाझात स्मशानभूमीचे चित्र तयार झाले आहे. सर्वत्र केवळ ढिगारा आणि धूर दिसत आहे.
युद्ध सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर दोन्ही कडील सर्वसामान्य नागरिकांच्या आक्रोशाचे फोटो व्हायरल होत आहेत. घरातील लोकांना गमावलेल्या लोकांचे फोटो हृदयद्रावक आहेत. यात इस्रायली नवजात बाळाची आई, शायली अटारी(Shaylee Atary) हिच्या टीव्ही मुलाखतीदरम्यान जे घडले ते पाहून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल. शनिवारी सकाळी २०-२५ पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यादरम्यान तिचा पती याहाव विनर अचानक कसा गायब झाला, हे शायली एका टीव्ही मुलाखतीत सांगत होती. मुलाखतीवेळी, शायलीने तिच्या एका महिन्याच्या मुलीला तिच्या मांडीवर घेतले होते आणि ती तिचा नवरा कुठेतरी जखमी झाला असावा किंवा त्याचे अपहरण झाले असावे असं माध्यमांना सांगत होती.
मुलाखतीतच मिळाली दुर्दैवी बातमी
दरम्यान, मुलाखतीवेळी शायली आईला मागे उभी असल्याचे पाहून ती थांबते. इस्त्रायली संरक्षण दलांशी फोनवर बोलत असताना तिची आई मागे जमिनीवर पडते. शायली "आई, आई ओरडते तर तिची आई डोकं धरून खाली बसते. त्यानंतर घरातील इतर सदस्य शायलीच्या हातून मुलाला घेतात आणि शायली ढसाढसा रडायला लागते. कारण तिच्या पतीचा मृतदेह सापडल्याची बातमी शायलीच्या आईला फोनवर मिळाली होती. या बातमीने सगळेच दु:खी होतात.
दरम्यान, ही युद्धाची भीषणता आहे. कुटुंबाने आम्हाला ते दाखवण्याची परवानगी दिली आहे जेणेकरून प्रत्येकाला इथली परिस्थिती कशी आहे ते समजू शकेल. असं शायलीची मुलाखत घेणाऱ्या स्काय न्यूजचे मुख्य वार्ताहर स्टुअर्ट रामसेने सांगितले. तर या पहिल्याच मुलाखतीत शायलीने नरसंहार सुरू असताना ती आपल्या मुलासह २७ तास अन्न-पाण्याशिवाय एका गोदामात लपून राहिली होती असा खुलासा केला.