दीर अल-बलाह : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात सामान्य लोकांचे नाहक जीव जात आहेत. रिपोर्टनुसार, मध्य गाझापट्टीतील नुसिरत शहरी निर्वासित शिबिरावर इस्रायलने रात्रभर केलेल्या हवाई हल्ल्यात 5 महिन्यांच्या बाळासह किमान 15 लोक ठार झाले. हमासद्वारे संचालित आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, युद्धाच्या सुरुवातीपासून मृतांची संख्या 26,000 हून अधिक जास्त झाली आहे. इस्त्रायली सैन्याने दक्षिण गाझामधील खान युनिस शहरात प्रवेश केला. इस्रायली लष्कराने शुक्रवारी तीन शेजारील भाग आणि खान युनिस निर्वासित शिबिर रिकामे करण्याचे आदेश दिले.
युद्धाच्या सुरुवातीपासून मरण पावलेल्या पॅलेस्टिनींची संख्या 26,083 वर पोहोचली आहे, तर 64,487 पॅलेस्टिनी जखमी झाले आहेत. मंत्रालयाने मृतांच्या संख्येत लढाऊ आणि नागरिक यांच्यात फरक केला नाही, परंतु मृत्यू झालेल्यांमध्ये जवळपास दोन तृतीयांश महिला आणि मुलांचा समावेश असल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. गेल्या 24 तासांत 183 जणांचा मृत्यू झाला असून 377 जण जखमी झाले आहेत, असे मंत्रालयाचे प्रवक्ते अश्रफ अल-किद्रा यांनी एका निवेदनात सांगितले. दरम्यान, हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता, ज्यामध्ये सुमारे 1200 इस्रायली मारले गेले होते.
दरम्यान, संयुक्त राष्ट्राच्या सर्वोच्च न्यायालयाने गाझामध्ये तात्काळ युद्धबंदीचे आदेश देण्यास नकार दिला, परंतु इस्रायलला जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. हा खटला दाखल करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने इस्रायलला आपली लष्करी मोहीम थांबवण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती न्यायालयाला केली होती. गाझामधील नरसंहाराचा इस्त्रायलवर आरोप असलेला खटला ते फेटाळणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. नरसंहाराचे आरोप फेटाळण्याचे इस्रायलचे अपीलही न्यायालयाने फेटाळले.
आवश्यक ती सर्व पावले उचलत राहू - नेतन्याहूइस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शुक्रवारी सांगितले की, इस्रायल स्वतःच्या बचावासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत राहील. नेतन्याहू यांचे हे वक्तव्य संयुक्त राष्ट्राच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आले आहे. नेतन्याहू यांनी नरसंहाराचे दावे अस्वीकार्य असल्याचे फेटाळून लावले आणि म्हटले की, 'आम्ही आमचा देश आणि नागरिकांच्या रक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत राहू.' दरम्यान, नेतन्याहू यांनी हमासचा अंत होईपर्यंत युद्ध सुरू ठेवण्याचा संकल्प केला असून इस्रायली सैन्य गाझावर सातत्याने हल्ले होत आहेत.