ग्लासगो - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथे COP-26 सम्मेलना व्यतिरिक्त, इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांनी पीएम मोदींचे भरभरून कौतुक केले. तसेच, आपण इस्रायलमधील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती आहात, असेही ते म्हणाले. याच वेळी बेनेट यांनी गंमतीत पंतप्रधान मोदींना त्यांच्या पक्षात येण्याचा प्रस्तावही दिला. यावर पंतप्रधान मोदीही मन मोळेपणाने हसले.
या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी, दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवरही चर्चा केली. तसेच, उच्च-तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावरही विचारांची देवाणघेवाण केली.
काय म्हणाले नफ्ताली -सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओनुसार, बेनेट पंतप्रधान मोदींना म्हणाले, “आपण इस्रायलमधील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती आहात.” याला उत्तर देताना मोदी म्हणाले, “धन्यवाद, धन्यवाद.” यानंतर, बेनेट यांनी मोदींना त्यांच्या यामिना पक्षात सामील होण्यास सांगितले. यावर दोन्ही नेत्यांनी हसत-हसत हस्तांदोलन केले. यावेळी बेनेट म्हणाले, “या आणि माझ्या पक्षात सामील व्हा.” तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी बेनेट यांच्याशी झालेल्या भेटीची आठवण करून देत सांगितले, की भारतातील लोक इस्रायलसोबतच्या मैत्रीला खूप महत्त्व देतात.
पीएमओनेही केले ट्विट -पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) ट्विट केले आहे, की इस्रायलसोबतची मैत्री आणखी घट्ट करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नफ्ताली बेनेट यांची ग्लासगो येथे यशस्वी बैठक झाली. दोन्ही नेत्यांनी आपल्या नागरिकांच्या हितासाठी सहकार्याच्या विविध उपायांना बळकट करण्यावर चर्चा केली." मोदी आणि बेनेट यांची ही भेट, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या गेल्या महिन्यातील इस्रायल भेटीदरम्यान मोदींच्या वतीने इस्रायली पंतप्रधानांना भारतात येण्याचे निमंत्र दिल्यानंतर झाली आहे.